कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, दोन दुकाने फोडली; पोलिसांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 04:26 PM2022-06-21T16:26:52+5:302022-06-21T16:27:26+5:30
चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार ? असाही प्रश्न त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
कणकवली : कणकवली शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून जुन्या भाजी मार्केट मधील मोबाईल दुरुस्तीची दोन दुकाने त्यांनी फोडली आहेत. त्या दुकानांमधील सामान अस्ताव्यस्त करत रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
शहरातील मुख्य चौकातील जुन्या भाजी मार्केटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईल रिपेरिंग करणारी रविकांत जाधव व मोडक यांच्या दुकानाच्या कड्या तोडून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील सामान अस्ताव्यस्त करून टाकले होते. चोरीची माहिती मिळताच दुकान मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कणकवली शहरातील मुख्य चौकात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार ? असाही प्रश्न त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
दोन दिवसापूर्वी पिसेकामते मंदिरातील दान पेटी तसेच वागदे येथील एक घर चोरट्यांनी फोडले होते. आता हे चोरटे कणकवलीत सक्रिय झाले असून त्यांनी मुख्य चौकामधील दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.