राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण
By admin | Published: July 16, 2017 11:57 PM2017-07-16T23:57:16+5:302017-07-16T23:57:16+5:30
राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील राजिवडा परिसरात दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या तरुणींपैकी एक वीस वर्षीय, तर दुसरी १७ वर्षीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हसीब अब्दुल हमीद फणसोपकर (४७, राजीवडा रत्नागिरी) यांची पत्नी व दोन मुली १४ जुलै रोजी रात्री जेवण करून टीव्ही पाहत बसल्या होत्या. वडील हसीब फणसोपकर हे लवकर झोपी गेले, तर आई मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या मुलींसोबत टीव्ही पाहत होती. त्यानंतर या दोन्ही मुली वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची आईही खालच्या खोलीत झोपी गेली.
रविवारी पहाटे आईला जाग आली. सर्वप्रथम ती आपल्या मुलींना उठविण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या दोन्ही मुली तेथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने पती हसीब फणसोपकर यांना उठवून सगळी हकिगत सांगितली. वडिलांनी परिसरात या मुलींचा शोध घेतला, परंतु त्या सापडल्या नाहीत.
घरातील वापरण्यात येणारी मोबाईलची सीम कार्डेही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.