नेरूर येथे एकाच दिवशी दोघांची आत्महत्या
By admin | Published: July 10, 2016 01:37 AM2016-07-10T01:37:31+5:302016-07-10T01:49:17+5:30
घटनेने जिल्ह्यात हळहळ : महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह युवा कामगाराचा समावेश
कुडाळ : तालुक्यातील नेरूर गावात शनिवारी एकाच दिवशी दोघांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली. दोन्ही आत्महत्यांची कारणे अस्पष्ट असून, यामध्ये पहिली आत्महत्या कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मानसी भास्कर शेणई-तिरोडकर (वय २२, नेरूर-गणेशनगर) या विद्यार्थिनीची आहे. तर दुसरी आत्महत्या कुडाळ येथे खासगी प्रेसमध्ये काम करणाऱ्या योगेश वामन शृंगारे (वय २७, रा. नेरूर-वाघोसेवाडी) या युवकाची आहे. एकाच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनांनी पंचक्रोशीत हळहळ व्यक्तहोत आहे.
कोल्हापूर येथे बी.ए.एम.एस.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या मानसी शेणई-तिरोडकर (वय २२) या वैद्यकीय क्षेत्राच्या विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोल्हापूरहून ती चार दिवसांपूर्वीच घरी आली होती.
शुक्रवारी रात्री मानसीने जेवण घेतल्यानंतर बंगल्यातील वरच्या मजल्यावरील रुममध्ये ती झोपायला गेली. शनिवारी सकाळी ती उठली नाही म्हणून आई तिला उठवायला गेली असता दरवाजा आतून बंद होता. तसेच ती आईच्या हाकेला ओ देत नव्हती. काहीच प्रत्युत्तर न आल्याने आईने दरवाजाचे लॉक तोडत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मानसी पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत लटकत होती. तसेच फॅनही फिरतच होता. हे दृश्य पाहून मानसीच्या आईने जोरदार हंबरडा फोडला. फॅन बंद करून मानसीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच तिचे निधन झाले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक एल. एल. वरुटे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. पोलिसांनी मानसी वापरत असलेला मोबाईल, एक सिमकार्ड व तिची वही अधिक तपासासाठी ताब्यात घेतली. तर पोलिस गेल्यानंतर नातेवाइकांना तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. मानसीने हल्लीच तिचा पूर्वीचा नंबर असलेले सिमकार्ड काढून दुसऱ्या नंबरचे सिमकार्ड घेतले होते. पोलिसांनी ही दोन्ही सिमकार्ड ताब्यात घेतली असून, कॉल डिटेल्स् व हस्ताक्षराची तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती दिली.
आत्महत्येच्या दुसऱ्या घटनेत नेरूर-वाघोसेवाडी येथील योगेश वामन शृंगारे (२७) या युवकाने राहत्या घराशेजारील मांगरामध्ये शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.
योगेश हा कुडाळमध्ये दुपारी कामावरून घरी आला होता. मात्र, घरी येऊन तो परत बाहेर गेला. तो खूप वेळ आला नाही. त्यामुळे त्याची आई त्याला शोधण्यासाठी घरा बाहेर आली असता घराशेजारील मांगरामध्ये त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या आईने हे दृश्य पाहून हंबरडा फोडला. त्यामुळे शेजारच्या ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली व योगेशला खाली काढले; पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.
योगेशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पडेलकर करीत आहेत. मृत योगेशच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. योगेशच्या वडिलांचे निधन होऊन एक वर्षही झाले नव्हते. ह्या दु:खातून शृंगारे कुटुंबीय बाहेर येत असतानाच योगेशच्या निधनामुळे कुटुंबीयांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (प्रतिनिधी)
नेरूरमध्ये व्यवहार बंद
वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या आणि त्यापाठोपाठ युवा कामगाराची आत्महत्या यामुळे नेरूरमध्ये दु:खाची छाया पसरली आहे. गावातील सर्व व्यवहार बहुतांशी बंद ठेवण्यात आले होते, तर दोन्ही घटनेने पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत
आहे.
हुशार असतानाही आत्महत्या?
मानसी ही खूप हुशार मुलगी होती. सर्व शालांत परीक्षेत तसेच बी.ए.एम.एस. परीक्षेतही तिने चांगले यश संपादन केले होते. ती स्वभावानेही चांगली होती. असे असताना तिने आत्महत्या का केली, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.