एटीएम घोटाळ््यातील दोन संशयितांना अटक
By Admin | Published: April 11, 2017 12:35 AM2017-04-11T00:35:39+5:302017-04-11T00:35:39+5:30
चिपळूण येथील प्रकरण; भरण्यासाठी दिलेल्या रकमेत कोट्यवधींची अफरातफर
रत्नागिरी : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर करणाऱ्या टोळीतील दोघांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. नीलेश नंदकुमार लाड व नीलेश मनोहर पवार अशी या दोघांची नावे असून, या टोळीचा म्होरक्या सुशील सुभाष मोरे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यानेच या फसवणुकीतील ९५ टक्के पैसे वापरले असल्याचे तपासात पुढे आले आहे.
चिपळूण येथे एटीएममध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेमध्ये कोट्यवधीची अफरातफर झाल्याचा प्रकार २४ मार्च रोजी उघड झाला होता. याप्रकरणी अरविंद अण्णासोा बनगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. कोल्हापूर ही कंपनी एटीएममध्ये रक्कम भरणा करण्याचे काम करते. आॅगस्ट २०१६ ते १८ नोव्हेबर २०१६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, खेर्डी, चिपळूण, सावर्डे, मार्गताम्हाणे, संगमेश्वर, लोटे व शिरगांव येथील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम या कंपनीकडे होते. या कंपनीमार्फत सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी), नीलेश पवार (रा. काटे) व नीलेश लाड (रा. चिपळूण) हे तिघे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करत होते.
आॅगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सुशील मोरे, नीलेश लाड व नीलेश पवार यांनी एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. कंपनीला खोटे संदेश पाठवून संपूर्ण रक्कम भरल्याची माहिती देत होते. थोडे-थोडे करत त्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर केली. त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्"ाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ नीलेश लाड व नीलेश पवार यांच्या मुसक्या आवळल्या. या कोट्यवधीच्या फसवणुकीत सुशील हाच या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात पुढे आले. १ कोटी २६ लाख ९६ हजार रुपयांतील ९५ टक्के पैशाचा वापर त्यानेच केला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पुढे आली आहे.
नीलेश लाड व पवार यांनी फसवणुकीतील रकमेतून जो काही पैसा मिळाला, तो आपली व्यसने व घर खर्चासाठी वापरला असल्याचा कबुली जवाब दिला आहे. या दोघांनाही पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असून, म्होरक्या सुशीलही लवकरच ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
सुशीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला
सुशील मोरे याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज
४ एप्रिल रोजी केला होता. त्यावर ७ एप्रिलला सुनावणी झाली आणि न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे लवकरच सुशीलच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.
नोटाबंदीने उघड केला घोटाळा
ज्या पद्धतीने या तिघांनी एटीएमसाठीच्या रकमेत जो अपहार केला तो आणखी बराच काळ पुढे सुरू राहिला असता. मात्र नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी निर्णय लागू झाल्यानंतर कंपनीने आॅडीट सुरू केले. त्यातून ही अफरातफर झाल्याचे पुढे आले.