Sindhudurg: तृतीयपंथी वेशातील व्यक्तींचा युवतीला पळवण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांनी पाठलाग करत पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:12 IST2025-03-28T14:12:04+5:302025-03-28T14:12:22+5:30
तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव बाजारपेठेतून दोन तृतीयपंथी वेशातील व्यक्तींनी चक्क नांदगाव तिठ्यावरील एका युवतीला पळवून नेत असताना ग्रामस्थांनी ...

Sindhudurg: तृतीयपंथी वेशातील व्यक्तींचा युवतीला पळवण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांनी पाठलाग करत पकडले
तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव बाजारपेठेतून दोन तृतीयपंथी वेशातील व्यक्तींनी चक्क नांदगाव तिठ्यावरील एका युवतीला पळवून नेत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्या युवतीला सोडवले. त्या युवतीला सहा आसनी रिक्षेतून हुंबरठ येथे ताब्यात घेतले. मात्र, ती युवती घरी येण्यास तयार नव्हती. त्या तृतीयपंथीयांनी त्या युवतीवर जादूटोणा केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
सध्या त्या युवतीवर मानसोपचारतज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सायंकाळी उशिरा कणकवली पोलिसांच्या तपासात ते दोघे तृतियपंथीय नसून पुरूष असल्याचे उघडकीस आले आहे.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नांदगाव बाजारपेठेमध्ये दोन तृतीयपंथी व्यक्ती फिरत होत्या. दुकानांमध्ये पैसे मागत असताना ते बाजारपेठेलगतच्या एका घरामध्ये गेले. त्या घरातील युवतीला त्यांनी बोलण्यात गुंतवले. त्यानंतर काही वेळाने ती युवती त्या दोघांसमवेत बाहेर जाण्यास निघाली. सहा आसनी रिक्षातून ती युवती आणि दोन तृतीयपंथीय कणकवलीच्या दिशेने निघाले. ही बाब नांदगावातील काही ग्रामस्थांना समजली. त्यानंतर दुचाकी आणि अन्य वाहने घेऊन ग्रामस्थांनी कणकवलीच्या दिशेने धाव घेतली.
या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनाही कळविण्यात आली. त्यानंतर त्यांचा पाठलाग करत हंबरट फाटा येथे सहा आसनी रिक्षा थांबविण्यात आली. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी युवतीला नातेवाइकांच्या ताब्यात दिले. मात्र, ती आपल्या घरी येण्यास नकार देत होती. अखेर तिला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोन तृतीय पंथीयांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तरुणीवर जादूटोणा केला असण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती. वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठा धोका टळला असल्याचे बोलले जात होते.
तपासाअंती त्या व्यक्ती तृतीय पंथी आहेत का? हे स्पष्ट होईल. दरम्यान पळवून नेलेल्या युवतीवर कुडाळ येथे मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे उपचार सुरू आहेत. तृतीय पंथी वेशातील त्या दोघांचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. याबाबत उशिरापर्यंत सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.
ते दोघे तृतीयपंथी नसून बुलढाणा येथील पुरूष
साडी आणि ब्लाऊज असा स्त्री वेश परिधान केलेले ते दोन्ही तृतीयपंथी नसून पुरूष असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. ते दोघे बुलढाणा जिल्ह्यातील असून दोघेही पत्नी आपली मुले कुटुंबासह मागील काही दिवस कुडाळ येथे राहत आहेत. स्त्री वेश परिधान करण्यामागे भिक्षा मागणे सोपे जावे म्हणून स्त्रीवेश परिधान केल्याचे दोघांनीही पोलिसांना सांगितले.