दोन अपघातांत दोघांचा बळी
By Admin | Published: January 20, 2015 11:06 PM2015-01-20T23:06:48+5:302015-01-21T23:49:18+5:30
सहा गंभीर जखमी : पालीत आजीसह नातवाचा मृत्यू; चरवेलीत टाटा सुमोला ट्रकची धडक
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पालीनजीक झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये आजी व नातवाचा मृत्यू झाला असून, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील चारजणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात फातिमा वाडकर (वय ५५) आणि त्यांचा अवघ्या दोन महिन्यांचा नातू हसनेल या दोघांचा मृत्यू झाला आहे.दोन अपघातांतील पहिला अपघात महामार्गावरील चरवेली येथे सकाळी आठ वाजता झाला, तर दुसरा भीषण अपघात अवघ्या तीनच तासांनी महामार्गावरच साधारण सात कि.मी. अंतरावर पाली-माईनवाडी येथे अकराच्या सुमारास झाला. पहिल्या अपघातात चरवेली येथे सुमो गाडीला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये सुमोतील दोघेजण जखमी झाले. पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मारुती ओमनी गाडी मोरीच्या सिमेंट कठड्यावर समोरून वेगाने धडकली.सकाळी आठ वाजता चरवेली येथे झालेल्या अपघातात सुमो (एमएच-०८/ आर ८२६८)चा चालक रोहित रवींद्र पवार (२२, पतितपावन मंदिर, रत्नागिरी) व मालक जितेंद्र भास्कर सावंत (झाडगाव, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. एमएच ०९ क्यू ६५१३ हा ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन सुमोवर चालकाच्या बाजूने धडकला. सुमोतील जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत.दुसऱ्या अपघातात हर्णैतील वाडकर कुटुंबावर काळाने घाला घातला. राजापूर तालुक्यातील कातळी येथील मूळचे रहिवासी असणारे मुजीद हसन वाडकर (५५) कुटुंबीयांसमवेत हर्णै येथे व्यवसायानिमित्त गेली सहा ते सात वर्षे वास्तव्यास आहेत. ते चार दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अलीमिया अब्दुल मजीद वाडकर (२६) यांच्या देवगड तालुक्यातील धालवली या सासरवाडीच्या गावी उरुसासाठी गेले होते. उरुसाचा कार्यक्रम आटोपून आज, मंगळवारी सकाळी धालवली ते येथून हर्णै येथे जाण्यास निघाले. पाली माईनवाडी येथील तीव्र वळणाच्या उतारावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करताना हूल दिल्याने मारुती ओमनीवरील चालक अलीमिया अब्दुल मजीद वाडकर यांचा ताबा सुटून गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या मातीच्या साईडपट्टीवर उतरली. ती पुन्हा रस्त्यावर घेण्याच्या प्रयत्नात असताना वेगामुळे समोरच्या मोरीच्या सिमेंट कठड्यावर जोराने आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. वाडकर कुटुंबीय मारुती व्हॅनमध्ये जखमी अवस्थेत अडकून पडले होते. या दणक्याने व्हॅनचा मागील दरवाजा तुटल्याने हसनेल अलिमिया वाडकर हा अवघ्या दोन महिन्यांचा चिमुरडा बालक बाहेर ओढ्यामध्ये फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. या बालकाची आजी फातिमा अब्दुल मजीद वाडकर (५०) यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. गाडी चालविणारे अलिमिया वाडकर (२६) यांचे दोन्ही पाय व्हॅनमध्ये अडकून चिरडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी कुलसुंबी (२४) व मोठा मुलगा आखीद (२) यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आजोबा अब्दुल वाडकर (५५) हेही गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त वाडकर कुटुंबीयांना प्रथम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून व पाली ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पाली येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वाडकर कुटुंबीयांतील फातिमा वाडकर व त्यांचा नातू हसनेल या दोघांचे निधन झाले.
वाडकर कुटुंबीयांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. यामध्ये अति गंभीर अवस्थेतील हसनेल या चिमुरड्याची परिस्थिती नाजूक पाहता त्याला तातडीने उपचारासाठी नेणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रीय आरोग्य मिशन (१०८) या रुग्णवाहिकेचे डॉ. कामत वेळकाढूपणा करत असल्याचे निदर्शनास आल्यावर वाडकर कुटुंबीयांना मदत करणारे खारेपाटण येथील रफिक नाईक यांनी कामत यांना खडेबोल सुनावून ‘१०८’ सेवेकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये पाली ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनीही संबंधित ‘१०८’मधील डॉक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केली. तोपर्यंत हसनेलची प्राणज्योत मालवली. या अपघाताचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एम. थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल रविकांत चव्हाण, प्रकाश कदम, रविकांत खरीवले, गावीत करत आहेत.
जीवनाश्यक वस्तू अस्ताव्यस्त
वाडकर कुटुंबीयांच्या ओमनीत सर्व जीवनावश्यक वस्तू होत्या. अपघात झाल्याने त्या सर्वत्र विखुरल्या होत्या. अपघात झाल्यावर घटनास्थळी तत्काळ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा हातखंबाचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर व कॉ. गुरव यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.