महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून दुचाकीस्वार जखमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:11 PM2021-01-04T16:11:34+5:302021-01-04T16:16:17+5:30
Kankavli Highway Accident- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये दिलीप बिल्डकाँन या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कणकवलीत अपघात घडला आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये दिलीप बिल्डकाँन या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कणकवलीत अपघात घडला आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ रोखून धरली. तसेच संबधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोडवर महामार्ग ठेकेदाराने पत्रे लावले आहेत. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल एम एच ०७ समोर महामार्गावर तब्बल सहा फूट उंचीचे ३ पत्रे कोसळले. त्याचवेळी कणकवली ते जानवली असा दुचाकी वरून प्रवास करीत असणाऱ्या नंदादीप सावंत (रा . जानवली ) यांच्या अंगावर त्यातील एक पत्रा पडला. त्यामुळे ते दुचाकीसह पत्र्याखाली अडकले.
या घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत सावंत यांना पत्र्याखालून बाहेर काढले. दुचाकीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ जखमी झालेल्या नंदादीप सावंत यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर यापूर्वी देखील चालत्या दुचाकीवर पत्रा कोसळून एक युवक जखमी झाला होता. तसेच उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग देखील कोसळला होता. त्यानंतर देखील महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले असून ही बाब पादचाऱ्यांच्या कधी तरी जीवावर बेतण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर ठेकेदाराच्या कामगारांनी काम सोडून तेथून पळ काढला.
कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ व नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मध्यस्ती करीत संतप्त नागरिकांची समजूत काढली. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र, महामार्गावर या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.