मराठा क्रांती मोर्चाच्या जागृतीसाठी २० आॅक्टोबरला कणकवलीत दुचाकी रॅली
By admin | Published: October 17, 2016 04:33 PM2016-10-17T16:33:02+5:302016-10-17T16:33:02+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा क्रांती मूक मोर्चा २३ आॅक्टोबरला ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा क्रांती मूक मोर्चा २३ आॅक्टोबरला ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या क्रांती मूक मोर्चासाठी कणकवली तालुक्यात जनजागृती करण्याच्यादृष्टीने २० आॅक्टोबरला दुपारी २ वाजता येथील मराठा मंडळाकडून भव्य दुचाकी रॅली काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
ही रॅली १९ आॅक्टोबरला निघणार होती. परंतु, महाविद्यालयाच्या परिक्षा सुरु असल्याने युवकांच्या आग्रहास्तव २० आॅक्टोबरला रॅली काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा बांधवांच्यावतीने जनजागृतीसाठी ठिकठिकाणी रॅली काढण्यात येत आहे. त्यानुसार कणकवलीत ही रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे.
कणकवली मराठा मंडळ येथुन २० आॅक्टोबरला दुपारी दुचाकी रॅलीचा शुभारंभ होईल. कणकवलीतील पू.अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठमार्गे पटकीदेवी, शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग असेल. कणकवली रेल्वेस्टेशन मार्गे सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे दुपारी ३ वाजता मराठा रॅलीचे भव्य स्वागत होईल. त्यानंतर कनेडीमार्गे फोंडा बाजारपेठ येथे दुपारी ३.३० वाजता मराठा समाज बांधवांकडुन रॅलीचे स्वागत, दुपारी ३.४५ वाजता लोरे येथे ही रॅली जाणार आहे. फोंडा-कासार्डेमार्गे कासार्डेतिठा येथे जोरदार रॅलीचे स्वागत, दुपारी ४.१५ वाजता नांदगाव तिठा येथे रॅलीचे आगमन व स्वागत होईल. सायंकाळी ४.३० वाजता हुंबरठ तिठा येथे रॅलीचे आगमन, सायंकाळी ५ वाजता तालुका मराठा क्रांती मोर्चा कार्यालयात या रॅलीची सांगता होईल. त्यामुळे तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.