पालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:05 PM2020-01-02T17:05:01+5:302020-01-02T17:06:18+5:30
हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण घेणार असल्याचा इशारा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिला.
कुडाळ : हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण घेणार असल्याचा इशारा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिला.
हुमरमळा-वालावल बांधकोंड येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम गेली तीन वर्षे रखडले आहे. त्यामुळे इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी ठिय्या केला.
याबाबत ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी अतुल बंगे यांना कल्पना देताच बंगे यांनी उपसभापती जयभारत पालव आणि लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता तोडणकर यांना घेऊन ग्रामपंचायत गाठली. मात्र, पालक आक्रमक झाले होते. यावेळी पालव यांनी अंगणवाडीचे काम रविवारपर्यंत खात्यामार्फत पूर्ण करा. ठेकेदारावर विश्वास ठेवू नका, अशा सूचना अभियंता तोडणकर यांना दिल्या.
दरम्यान, उपसभापती जयभारत पालव याठिकाणी प्रथमच आल्याने सरपंच अर्चना बंगे आणि ग्रामसेविका पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, युवासेना वालावल पंचायत समिती विभागप्रमुख मितेश वालावलकर, आशिष देसाई, शिवसेनेचे कृष्णा धुरी, संदेश चव्हाण, दत्ता गुंजकर, शैलेश मयेकर, अक्षय बंगे, अमित बंगे, भरत परब, रुपाली गुंजकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिकेचे स्वागत
दरम्यान, अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी या इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा घेणार असल्याचा इशारा बंगे यांनी दिला. तसेच पालकांशी चर्चा केली. उपसभापती पालव यांच्या भूमिकेचे पालकांनी स्वागत केले. सरपंच अर्चना बंगे यांनीही सोमवारपर्यंत इमारत ताब्यात न मिळाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी दिला.