सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 11:34 AM2021-12-30T11:34:59+5:302021-12-30T11:42:18+5:30
संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना आता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कंगोरे देखील समोर येत आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या रात्री काल, बुधवारी एका पदाधिकाऱ्याच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली. रात्री उशिरा सदर पदाधिकारी घरी आल्यावर त्याला हा प्रकार निदर्शनास आल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांने केला. त्यानंतर या प्रकाराची चर्चा सुरू झाली.
जिल्हा बँक निवडणूक ही भाजपा आणि महाविकास आघाडी करीता प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्हा पक्षांनी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार रणनिती आखली आहे. यातच हा जादूटोण्याचा प्रकार समोर आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान आज सकाळी मतदानावेळी कणकवलीत तहसील केंद्रावर जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाच्या महिला उमेदवार प्रज्ञा ढवण आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरण मिटविले. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.