जेटी हटावसाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण
By Admin | Published: March 3, 2015 09:28 PM2015-03-03T21:28:20+5:302015-03-03T21:56:32+5:30
आरोंदावासीय आक्रमक : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी : ‘जेटी हटाव, मच्छिमार बचाव’, ‘जेटी हटाव, आरोंदा बचाव’ या सूचनांचे फलक घेऊन आरोंदा किरणपाणी खाडीकिनारी झालेल्या प्रदूषणकारी जेटी प्रकल्पास मंगळवारी आरोंदा मच्छिमार सहकारी संस्थेच्यावतीने विरोध करत जिल्हाधिकारी भवनासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मच्छिमार, ग्रामस्थ, शेतकरी, महिला उपस्थित होते.मंगळवारी आरोंदा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे, सचिव शशिकांत पेडणेकर, कोकण प्रकल्पग्रस्त समन्वय समिती अध्यक्ष अविनाश शिरोडकर, आबा केरकर, संजय कोचरेकर, शुभांगी पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, उमा बुडे, रुक्मिणी कोरगांवकर, मालवण श्रमिक मच्छिमार संघटनेचे रमेश धुरी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, विकास केरकर यांच्यासह शेकडो आरोंदावासीय उपस्थित होते.आरोंदा जेटीविरोधात मंगळवारी मच्छिमार, ग्रामस्थ, महिला लाक्षणिक उपोषणासाठी जिल्हाधिकारी भवनासमोर जमले होते. यात विविध घोषणा देणारे सूचना फलकही उपोषणकर्त्यांच्या हातात होते व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरोंदा मच्छिमारांना ८ फेब्रुवारी २०१५ पासून आरोंदा तेरेखोल खाडीत मासेमारी करण्यास पोलिसांनी दमदाटी केली. धमक्या दिल्या तरी या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, निरीच्या अहवालाप्रमाणे ज्या जेटी २०१० पूर्वी अस्तित्वात नव्हत्या अशा बेकायदेशीर ठरलेल्या जेटीवर कोळशासारखा प्रदूषणकारी घटक उतरविण्यात आला. त्या संबंधितांवर कारवाई करावी. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निरीने दिलेल्या अहवालात एम. सी. झेड. च्या नियमांचे उल्लंघन करून ३ नव्या जेटी बांधण्याचे काम केलेले आहे. त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच ५ जानेवारी रोजी निरपराध आरोंदा ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
आरोंदा जेटीप्रश्नी लढा, सुरूच ठेवणार!
मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने आता आम्ही शिमगोत्सवानंतर आरोंदा येथे बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत. त्यानेही जाग आली नाही तर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा देत राजकीय मंडळी जेटीसंदर्भात वारंवार ‘पलटी’ (भूमिकेत बदल) मारत असल्याने स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधीकडून त्यांची या जेटी संदर्भात लेखी स्वरूपात भूमिका घेतली जाईल. निवडणूक काळात कोणत्याही स्वरुपात जेटी होऊ देणार नाही असे आश्वासन देणारे आता खुर्चीत बसल्यानंतर आपले आश्वासन विसरून या मच्छिमारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.आरोंदा जेटीप्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील असा इशारा मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी रविकिरण तोरसकर, आबा केरकर, गोकुळदास मोटे यांनी दिला आहे.
शासनाची दिशाभूल करून आरोंदा जेटी प्रकल्प सुरु आहे. या विरोधात तेथील स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थ, शेतकरी, महिला गेली साडेतीन वर्षे लढा देत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आज लाक्षणिक उपोषणही मच्छिमार बांधवांनी केले. मात्र या उपोषणाची दखल घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही. यापुढे आंदोलन आणखीन तीव्र होणार आहे. जेटीबाबत कागदपत्रे बोगस असून या विरोधात आपण न्यायालयात जाणार.
- डॉ. जयेंद्र परूळेकर, काँग्रेस प्रवक्ते