सावडाव मारहाणप्रकरणी उद्धवसेना आक्रमक; कारवाई न झाल्यास.., कणकवली पोलिस अधिकाऱ्यांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:39 IST2025-04-19T16:39:37+5:302025-04-19T16:39:37+5:30
आरोपींवर ३०७ कलम लावा!

सावडाव मारहाणप्रकरणी उद्धवसेना आक्रमक; कारवाई न झाल्यास.., कणकवली पोलिस अधिकाऱ्यांना दिला इशारा
कणकवली : सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला सावडाव उपसरपंच दत्ताराम काटे यांच्यासह अन्य तिघांनी मारहाण केली. पाच दिवस उलटून गेले, तरीही पोलिसांनी एकाही आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या उद्धवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कणकवलीपोलिस ठाण्यावर धडक दिली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी कारवाईबाबतच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला.
पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सावडाव हाणामारी प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिस त्यांना अभय देत असल्याने सिंधुदुर्गची वाटचाल बीड जिल्ह्याप्रमाणे होत आहे, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी यावेळी केला. तसेच येत्या दोन दिवसांत सावडाव प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कणकवली पोलिस ठाण्यात यावेळी उपस्थित असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक मधुरा पालव, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, राजू राठोड, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, तात्या निकम, धीरज मेस्त्री आदींसह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेवर जोरदार टीका केली. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच सावडाव घटनेतील सर्व आरोपी मोकाट आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणप्रकरणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे देशमुख यांचा नंतर खून झाला. त्याच धर्तीवर सावडाव प्रकरणात कणकवली पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत.
पोलिसांच्या या भूमिकेमुळे सावडाव गावातील अनेकजण आपणास कधीही मारहाण होऊ शकते, प्रसंगी खूनदेखील होऊ शकतो, अशा भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे सावडाव मारहाणप्रकरणी आरोपींवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी यावेळी दिला.
आरोपींवर ३०७ कलम लावा!
सावडाव मारहाणप्रकरणी आरोपींवर ३०७ कलम लावण्यात यावे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.