'सावंतवाडी विधानसभेवर उद्धवसेनेचाच अधिकार'

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 29, 2024 06:12 PM2024-07-29T18:12:42+5:302024-07-29T18:13:08+5:30

'धनशक्तीच्या जिवावर जर कोणी मते घेऊन आमदार होण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते कधीच पूर्ण होणार नाही'

Uddhav Sena right on Sawantwadi Legislative Assembly | 'सावंतवाडी विधानसभेवर उद्धवसेनेचाच अधिकार'

'सावंतवाडी विधानसभेवर उद्धवसेनेचाच अधिकार'

वैभव साळकर

दोडामार्ग : सावंतवाडीविधानसभा मतदारसंघाला संस्थानिक काळाचा वारसा आहे. मात्र आतापर्यंत अनेकांनी या मतदारसंघाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. आणि त्यांच्या या स्वार्थी राजकारणात इथली जनता चांगलीच भाजून-पोळून निघाली आहे. मात्र आता यापुढे ही परिस्थिती राहणार नाही. कोणीही यावे आणि टपली मारून जावे असा हा मतदारसंघ नसून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात धनशक्तीच्या जिवावर जर कोणी मते घेऊन आमदार होण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते कधीच पूर्ण होणार नाही. या मतदारसंघातून शेतकऱ्याचाच मुलगा आमदार म्हणून इथली जनता निवडून देईल, असा विश्वास उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी व्यक्त केला.

धुरी यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रकच दिले असून, त्यातून निवडणुकीसाठी भाऊगर्दी करणाऱ्या इच्छुकांचे चांगलेच कान टोचले आहेत. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सलग दहा वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच अधिकार आहे आणि हा निकष राज्यातील इतर सर्व मतदारसंघामध्ये आहे तसा सावंतवाडी मतदारसंघासाठी देखील आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मित्रपक्षांमध्ये काम करत असताना आपण निवडणूक ही अपक्ष लढवणार अशी भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ घेतील तो आपणास मान्य आहे असे समजून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे, असे म्हणत महाविकास आघाडीतील मित्रपक्षामधील निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यावरही धुरी यांनी हल्ला चढवला.

सध्या मतदारसंघाची परिस्थिती पाहता अनेक धनाढ्य लोक लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा आपण पैसे देऊन मत विकत घेऊ अशा भ्रमात आहेत व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी धनशक्तीच्या माध्यमातून करत आहेत. मात्र इथली जनता सुज्ञ आहे स्थानिक उमेदवारास प्राधान्य देऊन जनता इथला स्थानिक व जनतेची कामे करणारा उमेदवार हा विधानसभेवर पाठवतील याची मला खात्री असल्याचे प्रसिद्धी पत्रकात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी म्हटले आहे.

Web Title: Uddhav Sena right on Sawantwadi Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.