Sindhudurg: शेर्पे येथील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:43 PM2024-05-08T15:43:52+5:302024-05-08T15:44:35+5:30
खारेपाटण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना ...
खारेपाटण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना मंगळवारी सायंकाळी ६:२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६:०० पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते बाळा राऊत हे शेर्पे येथे दुकानात बसले असता, अचानक ६:२०च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते आले. त्यानंतर, त्यांनी काही समजण्याच्या आत ‘मला लाथाबुक्क्यांनी व दांड्यांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली असल्याचे’ जखमी शिवसैनिक बाळा राऊत यांनी सांगितले, तर भाजप पक्षाचे कार्यकर्ते बाळा जठार व दिलीप तळेकर, नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.
ही घटना समजताच उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कन्हैया पारकर, कणकवली उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने खारेपाटण येथे दाखल झाले, तसेच खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे उपचार सुरू असलेले जखमी शिवसैनिक कार्यकर्ते बाळा राऊत यांची भेट घेत विचारपूस केली.
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाही न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला.