सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर!
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 3, 2024 01:11 PM2024-05-03T13:11:45+5:302024-05-03T13:12:31+5:30
महेश सरनाईक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही ...
महेश सरनाईक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही त्यांच्या नावाचे वलय कायम आहे. बाळासाहेब हे आमचे दैवत होते, आज आहेत आणि भविष्यातही राहतील. असे सांगणारे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आज उद्धव ठाकरेंसमवेत नसतील पण ते जेथे कुठे असतील तेथे त्यांच्या तोंडून हीच वाक्ये कायम ऐकायला मिळतील. ठाकरे नावाची जादू गेली दशकानुदशके महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत ठाकरे नाव आपल्यासमवेत असावे म्हणून भाजपाने राज ठाकरेंना गळी पाडल्याचे मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. राज्यातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निवडणूक होणार आहे. भाजपाकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. उद्धवसेनेचे सचिव, विद्यमान खासदार विनायक राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा नशीब आजमावणार आहेत.
महायुतीकडून राणेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापुरात सभा झाली, तर उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा झाला. आता उद्या ३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रत्नागिरीत, तर उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा होणार आहे. कणकवलीत ज्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्याच मैदानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ४ मे रोजी सभा होणार असून, ही प्रचाराच्या समारोपाची सभा असणार आहे. हा निवडणुकीचा सामना राऊत आणि राणे यांच्यात असला तरी राणे आणि ठाकरे घराण्यातील वादाची किनार त्याला लाभल्याने ठाकरे विरूद्ध राणे यांच्या राजकीय लढाईचा पुढील अंक म्हणून पाहिला जात आहे.
कणकवलीत उद्धव ठाकरे हे जे काही बोलणार, त्यांना त्यांच्याच ठाकरे शैलीत उत्तर देण्यासाठी राज्यातील राजकीय सभांव्दारे व्यासपीठ गाजविणाऱ्या राज ठाकरे यांना राणे आणि पर्यायाने भाजपाने मैदानात उतरविले आहे. गुढीपाडवा मिळाव्यात केवळ नरेंद्र मोदींसाठी मनसेने महायुतीला राजकीय पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांची ही कोकणातील आणि राज्यातील पहिलीच जाहीर प्रचारसभा असल्याने ठाकरे काय बोलणार ? ते उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांचा कसा समाचार घेणार ? याकडे संपूर्ण कोकणासह राज्य आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे.