..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: August 13, 2024 04:33 PM2024-08-13T16:33:18+5:302024-08-13T16:33:40+5:30
..तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल
कणकवली : ठाकरे सरकारच्या काळ्या आठवणी अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्य अधोगतिकडे गेले होते. वसुली करण्यापलीकडे काही काम या सरकारने केले नाही. त्यामुळे ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथे मंगळवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांनी पुन्हा काँगेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पुन्हा लायकी काढली आहे. दिल्लीत जाऊन काँगेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय धरायचे, त्यांना मुजरे करायचे आणि राज्यात येऊन छाती पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर बोलायचे ही त्यांची वृत्ती आहे.
तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल
मुंबई महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुका उशिरा होत आहेत. याला कारण ठाकरे व त्यांचे सहकारीच आहेत. ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या हे संजय राऊत यांना माहित नाही का? ज्या दिवशी ठाकरे गट याचिका मागे घेईल तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल.
राज्यातील बहिणी सुज्ञ
रवी राणांनी भाषण करताना मिश्किल टोले लागवले होते. ते संजय राऊत यांना समजले नाहीत. ठाकरेंचे सरकार आले कि लाडकी बहीण योजना बंद करणार असे राऊत बोलले होते. राज्यातील बहिणी सुज्ञ आहेत. त्या योग्य निर्णय घेतील. ठाकरे सरकार परत येणार नाही. तसेच महायुती सरकार व लाडकी बहीण योजना सुद्धा कायम सुरू रहाणार आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा
मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटले. त्यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि तीच भूमिका पवार यांनी मांडली आहे. आमच्या महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला पवार यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे समाजामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आता बंद करा. सर्वच नेत्यांची हीच भूमिका असेल तर हिंदुमध्ये फूट पाडण्याचे काम कोण करतय ? याचा शोध जनता घेईल. सरकारी नोकऱ्या मुस्लिम समाजाला मिळू न देण्याचा छुपा कार्यक्रम कोण करत आहे. हे कालच्या विधानावरून स्पष्ट झालंय असेही ते म्हणाले.