उंबर्डे ग्रामस्थांचे उपोषण, चर्चा निष्फळ : वीजवाहिन्या काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 03:14 PM2020-11-05T15:14:59+5:302020-11-05T15:16:11+5:30
mahavitran, sindhudurgnews शेतजमिनीतून चुकीच्या पध्दतीने नेलेली ३३ केव्ही वीजवाहिनी अन्य गावांप्रमाणे रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी. या मागणीसाठी उंबर्डे ग्रामस्थांनी बुधवारी (दि.४) येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.
वैभववाडी : शेतजमिनीतून चुकीच्या पध्दतीने नेलेली ३३ केव्ही वीजवाहिनी अन्य गावांप्रमाणे रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी. या मागणीसाठी उंबर्डे ग्रामस्थांनी बुधवारी (दि.४) येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.
या आंदोलनाला भाजपने पाठींबा दिला असून उपोषणकर्त्यांशी स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्ते महावितरणसमोर ठाण मांडून होते.
खारेपाटण ते भुईबावडा अशा ३३ केव्ही वीज वाहिनीचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले. यातील कोळपेपर्यंत वीजवाहिनी रस्त्याच्या कडेने नेली आहे. परंतु त्यानंतर उंबर्डे गावामध्ये ही वीजवाहिनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून नेण्यात आली आहे.
यासंदर्भात उंबर्डे ग्रामस्थांनी सातत्याने वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधूनही वीजवाहिनी रस्त्याकडेने नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. परंतु, वीज वितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरपंच एस. एम. बोबडे, रमझान रमदुल, उमर रमदूल, सदानंद दळवी, उदय मुद्रस, आलिबा बोथरे, दशरथ दळवी, धर्मरक्षित जाधव, वैभवी दळवी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत उपोषण स्थगित करणार नाही, अशी ताठर भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, अरविंद रावराणे, किशोर दळवी यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठींबा दिला.