पोलिसांच्या मारहाणीमुळेच उमेश पिलणकरचा मृत्यू!
By admin | Published: April 3, 2015 11:25 PM2015-04-03T23:25:19+5:302015-04-04T00:07:40+5:30
नातेवाइकांचा आरोप : पोलिसांनी भेटूही दिले नाही
रत्नागिरी : बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी अटक केलेल्या व पोलीस कोठडी झाली असताना जिल्हा रुग्णालयात उमेश कमलाकर पिलणकर याचा मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. उमेश पिलणकर याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही नातेवाइकांना त्याची भेट घेऊ देण्यात आली नाही. मृत्यू झाल्यावर साडेचार तास जवळच्या नातेवाइकांना माहिती न देताच मृतदेह मिरजेला हलविला, असा खळबळजनक आरोप उमेशचे चुलत बंधू शेखर नारायण पिलणकर व त्यांच्या नातेवाइकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने उमेशच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.
याबाबत शेखर पिलणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनाही निवेदन सादर केले असून, ज्या पोलिसांनी उमेशला अटक केली त्यांनीच त्याला पोलीस कोठडीत मारहाण केली काय, याची सखोल चौकशी करावी व संंबंधितांवर कडक कारवाई करावी. पोलीस कोठडी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उमेशला का दाखल केले, त्याची प्रकृती कशामुळे बिघडली ते नातेवाइकांना सांगण्यात आले नाही. उमेशला कसलाही आजार नसताना त्याचा मृत्यू कसा काय झाला? उमेशला भेटण्यास नातेवाईकांना का नकार देण्यात आला? त्याचेही कारण सांगितलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. उमेश पिलणकरच्या मृत्यूबाबत सायंकाळी पाच वाजता शेखर पिलणकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी मृत उमेशचे नातेवाईक राकेश साळवी, अमोल पिलणकर, सूर्यकांत पिलणकर, श्रीकांत पिलणकर, विवेक पिलणकर, स्वप्निल पिलणकर तसेच उमेशचे पुतणे मंगेश पिलणकर व संतोष पिलणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उमेशचा मृत्यू नैसर्गिक
उमेश पिलणकर याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथे गुरुवारी रात्री २ वा. रत्नागिरीतून हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीत उमेश पिलणकर याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा अहवाल आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलिसांची लपवाछपवी; नातेवाइकांचा आरोप
उमेश पिलणकर याला उपचारासाठी २९ मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला नातेवाईक भेटण्यास गेले असता भेट नाकारण्यात आली. बहिणीलाही भेट नाकारली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून, पोलीस या मृत्यू प्रकरणात लपवाछपवी करीत आहेत, असा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी ज्यांच्या मारहाणीमुळे उमेशचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काही काळ घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.