उमेश शेट्ये सेनेला जय महाराष्ट्र?
By admin | Published: October 5, 2015 09:56 PM2015-10-05T21:56:10+5:302015-10-06T00:41:08+5:30
रत्नागिरी : तटकरेंच्या आशीर्वादाने बुधवारी प्रवेश शक्य, राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही दुजोरा
रत्नागिरी : वन टू का फोर करीत तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले व नंतर नेतृत्व चेपले गेलेले रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेश शेट्ये येत्या दोन दिवसांत स्वगृही अर्थात राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये परतणार आहेत. या प्रवेशाबाबत राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दुजोरा दिला असून, बुधवारी हा प्रवेश शक्य असल्याचे सांगण्यात आले. या प्रवेशामागे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे डावपेच असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आमदार उदय सामंत यांना जोरदार शह देण्यासाठी हा ‘चक्रव्यूह’ रचण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उमेश शेट्ये हे २००० सालापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात कार्यरत होते. त्या काळात त्यांनी रत्नागिरीचे नगराध्यक्षपद भूषविले होते. नगराध्यक्षपदी असताना तटकरे हे राष्ट्रवादी - कॉँग्रेस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. याच काळात तटकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवून शेट्ये यांनी शहरातील विकासकामांना चांगली गती दिली होती. रत्नागिरी शहरातील सावरकर नाट्यगृह, शहराच्या मुख्य रस्त्यावरील दुभाजक तसेच अनेक विकासकामे शेट्ये यांच्या काळात झाली. तीन वर्षांपूर्वीच ते सेनेत गेले होते.
नोव्हेंबर २०१४मध्ये झालेल्या रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला व सेनेचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान करून उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. मात्र, पक्षांतर कायद्यात त्यांचे वेगळा गट स्थापन करणे नियमबाह्य ठरले व चारही जणांना अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर या चार जागांसाठी येत्या १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीने सर्वाधिक प्रतिष्ठेची केली आहे, तर स्थानिक लोकप्रतिनिधींना सेनेसाठी या जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेनेचे आमदार उदय सामंत यांच्यासमोर तटकरे यांनी ‘राजकीय चक्रव्यूह’ निर्माण केल्याची चर्चा आहे. पोटनिवडणुकीत तटकरेंनी सेनेची कोंडी करण्याचे डावपेच आखले आहेत. शिवसेनेतही सर्वकाही आलबेल नाही. सेनेअंतर्गत नव्या जुन्यांच्या वादामुळेही सेनेला पोटनिवडणुकीत फटका बसण्याची भीती आहेच. उमेश शेट्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सेनेला ताकद पणाला लावावी लागेल. त्यातच सेनेच्या दोन गटात शीतयुध्द सुरू असून, त्याचा फटकाही सेनेच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. या चारही जागा जिंकण्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)
तटकरेंचा चक्रव्यूह सेना भेदणार का?
पिछाडीवर गेलेल्या राष्ट्रवादीला रत्नागिरीत पुन्हा जोर देण्यासाठी तटकरे सरसावले असून, शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात शेट्येंचा पक्षप्रवेश निश्चित झाला.