खैर झाडांची अनधिकृत तोड; पाचजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 05:01 PM2019-11-22T17:01:29+5:302019-11-22T17:02:52+5:30
या प्रकरणातील संशयित आरोपींनी खैर झाडाचा काही भाग घरी आणून तो शेडला व तेसेबांबर्डे येथे विकला असून तो माल आम्ही ताब्यात घेतला असल्याची माहिती चिरमे यांनी दिली.
कुडाळ : कडावल वनक्षेत्रात अनधिकृतरित्या खैर झाडांची तोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाचही संशयित आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असून या प्रकरणाचा अधिक तपास कडावल वनविभागाचे वनक्षेत्रपाल करीत आहेत.
याबाबत कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे यांनी माहिती दिली की, कडावल वनक्षेत्रातील नारूर या परिसरातील वनक्षेत्रात वनविभागाच्या कर्मचा-यांना गस्त घालताना खैर झाडाचे १५ बुडे तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. या तोडलेल्या झाडांचा बराचसा भाग गायब होता. त्यामुळे या झाडांची अनधिकृतपणे वृक्षतोड झाल्याचे आमच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला असता ही अनधिकृत वृक्षतोड आॅक्टोबर महिन्यात केली असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यामुळे आम्ही या प्रकरणी निवजे येथील दीपेश कदम व आनंद घोगळे यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत वन कोठडी सुनावली होती.
त्यानंतर याप्रकरणी फरार असलेले निवजे येथील संशयित महेंद्र पालव, नीतेश शेडगे, प्रदीप राऊळ यांना बुधवारी निवजे गावातून ताब्यात घेतले व अटक केली. या सर्व पाचही संशयितांना वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणातील संशयित आरोपींनी खैर झाडाचा काही भाग घरी आणून तो शेडला व तेसेबांबर्डे येथे विकला असून तो माल आम्ही ताब्यात घेतला असल्याची माहिती चिरमे यांनी दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी विभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक आय. डी. जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे व कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे हे करीत आहेत.