अनधिकृत बांधकामे फोफावली

By admin | Published: February 21, 2017 05:59 AM2017-02-21T05:59:24+5:302017-02-21T05:59:24+5:30

ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे

Unauthorized constructions | अनधिकृत बांधकामे फोफावली

अनधिकृत बांधकामे फोफावली

Next

ठाणे : ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. ठाणे, दिवा, उल्हासनगर परिसरात भराव टाकून रात्रीचा दिवस करत बांधकामे सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शास्ती रद्द केल्याची घोषणा करताच आणि शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या बांधकामांना वेग आला आहे. यापूर्वी अर्धवट अवस्थेत असलेली बांधकामेही आता पूर्ण केली जात आहेत. दिवा परिसरात बेकायदा भराव घालून यापूर्वीच खारफुटी सुकवण्यात आली आहे. तेथे सध्या रात्रभर मातीचे ट्रक फिरत आहेत आणि भराव घातला जात आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकांच्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत त्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. दिवा परिसरात जाळलेल्या किंवा सुकवलेल्या खारफुटीच्या परिसरात, डम्पिंगच्या भागात सर्रास भरावाचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक बिल्डरांची त्याला फूस असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
उल्हासनगरमध्येही रातोरात बांधकामे उभी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी अर्धवट ठेवलेली बांधकामे पूर्ण केली जात आहेत किंवा पालिकेने जी बांधकामे अर्धवट अवस्थेत हातोडा मारून तोडली आहेत, ती पूर्ण केली जात आहेत. (प्रतिनिधी)

केडीएमसीचे कानांवर हात
कल्याण : बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश आले असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने घर खरेदी करताना तुमची तुम्ही चौकशी करून घ्या, असे सांगत जबाबदारीपासून पाठ फिरवत हात वर केले आहेत. २७ गावांमध्ये चौकशी करून मगच घर घ्या. खोट्या व फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन करणारे पत्रकच पालिकेने काढले आहे. यातील १० गावे ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर झाली आहेत. उरलेल्या १७ गावांमधील बेकायदा बांधकामांची यादी एमएमआरडीएने केडीएमसीला सप्टेंबरमध्ये दिली आहे. पण त्या ५५२ बांधकामांवर आजतागायत कारवाई झालेली नाही.

Web Title: Unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.