अनधिकृत वाळू उत्खनन, मालवण तालुक्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:09 PM2019-09-26T17:09:01+5:302019-09-26T17:11:46+5:30
मालवण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
मालवण : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने ते वाळू माफियांना पाठिंबा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाळू उत्खनन, वाहतूकीमुळे गोरगरिबांना त्रास होत आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास ओरोस येथील गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
तालुक्यातील आंबेरी बागवाडी, देवली या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दोन यावेळेत वाळू उपसा व अनधिकृत वाहतूक होत आहे ती बंद करावी. आंबेरी ते मुख्यरस्त्याकडे सदानंद गोरे यांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले. अवजड वाहतूकीमुळेच ही झाडे पडली. येथील रस्ता आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.
मसुरे, तेरई, कालावल तसेच धामापूर-बौद्धवाडी तसेच काळसे वाकवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन सायंकाळी सहा ते पहाटे चार यावेळेत सुरू आहे. याठिकाणी परप्रांतीय कामगारांमुळे गावचे वातावरण कलुषित होत आहे. वाळू उत्खननास होड्यांना दिलेली परवानगी मेरीटाईम बोर्डाने तपासावी. परवानग्या नसलेल्या होड्यांवर कारवाई करावी.
अनधिकृत वाळू उपसा, वाहतुकीवर कारवाईसह अन्य महत्वाच्या विषयांवर कारवाईचे पाऊल न उचलल्यास गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही केनवडेकर यांनी दिला आहे.