Sindhudurg News: अनधिकृत वाळू उत्खनन बोटींवर महिलांची धडक, बोटींचे नांगर घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:35 PM2023-02-04T13:35:00+5:302023-02-04T13:35:20+5:30
दरम्यान वाळू उत्खनन बोटींनी पळ काढला.
मालवण : मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खननामुळे पाणखोल जुवा येथे धोका पोहोचत आहे. वारंवार सांगूनही अनधिकृत वाळू उत्खनन बंद न झाल्याने याठिकाणच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट खाडीपात्रात जात वाळू उत्खनन करणाऱ्या बोटीचे नांगर ताब्यात घेतले. दरम्यान, मालवण तहसीलदार श्रीपाद पाटील यांना महिलांनी घटनास्थळी येण्याची विनंती केली. तहसीलदार येताच जप्त केलेले नांगर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, या दरम्यान वाळू उत्खनन बोटींनी पळ काढला.
सुमारे १० ते १५ बोटी व ६० ते ७० परप्रांतीय कामगार होते. रोज अनधिकृत स्वरूपात केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननामुळे पाणखोल जुवा बेटाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे वाळू उत्खनन थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महिलांनी आक्रमक व धाडसी भूमिका घेत वाळू उत्खनन बोटींचे नांगर ताब्यात घेतले.
तहसीलदार तत्काळ घटनास्थळी
महसूल प्रशासन येईपर्यंत परप्रांतीय कामगारांनी खाडीपात्रातून बोटी पळविल्या. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत महिलांनी जप्त केलेले नांगर महसूल विभागाच्या ताब्यात घेतले. दरम्यान, मेरिटाइम बोर्ड यांच्याकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन बोटींवर कारवाई होत नसल्याने आणि पोलिस प्रशासनाकडून परप्रांतीय मजुरांवर कारवाई केली जात नसल्याने वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप आक्रमक महिलांनी केला आहे.
बेटाची धूप
पाणखोल जुवा बेटाच्या परिसरात सतत होत असलेल्या वाळू उत्खननामुळे बेटाची धूप होत असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. मात्र, रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाळू उत्खननामुळे नागरिक त्रस्त झाल्याने महिलांनी कायदा हातात घेतला.