साकाविरहित तंत्राची शिफारस होणार

By admin | Published: April 26, 2015 10:04 PM2015-04-26T22:04:00+5:302015-04-27T00:13:54+5:30

बागायतदारांसाठी खुषखबर : कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन यशस्वी

Unconscious technique will be recommended | साकाविरहित तंत्राची शिफारस होणार

साकाविरहित तंत्राची शिफारस होणार

Next

शिवाजी गोरे - दापोली-आंब्याचा राजा हापूस हा जगप्रसिद्ध आहे. कोकणातील हापूसला देश-विदेशातून मोठी मागणी असते. परंतु, हापूस आंब्यात निर्माण होणारा साका ही विकृती आहे. हापूस आंब्यातील साक्यामुळे देश-विदेशातील बाजारपेठेत हापूसवर काही मर्यादा आल्याचे आढळून येत आहे. परंतु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी झाडावरील फळांना कागदी पिशवी घालून आंब्यातील साका नष्ट होत असल्याचा शोध लावला आहे. हापूस आंब्यासाठी ही शुभ वार्ता असून लवकरच याची शिफारस विद्यापीठ करणार आहे.
कोकणातील हापूस आंब्याला साका हे लागलेले दुष्टचक्रच म्हणावे लागेल. हापूस आंब्यातील साका नष्ट करणे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. साक्यामुळे हापूस आंब्याच्या दरावर परिणाम होत आहे. आंब्यातील साक्यामुळे बाजारपेठेत सुद्धा मागणीवर मर्यादा येऊ लागली आहे. आंब्यामध्ये साका येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी एप्रिल-मे महिन्यात उष्णता वाढलेली असते. ही वाढलेली उष्णता थेट फळावर पडते. त्यामुळे फळामध्ये साक्याचे प्रमाण वाढते. जर ही उष्णता फळाला लागली नाही तर फळामध्ये साका तयार होत नाही. परंतु, उष्णता फळापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी शास्त्रज्ञांनी सतत दोन वर्षे फळांना पिशव्या घालून आंब्यातील साका कमी केला आहे. फळांना पिशव्या घातल्या तर साका होण्याचे प्रमाण कमी होते असा शोध संशोधनातून लागला आहे.
विद्यापीठाने जुन्या आंबा बागाचे पुनरूज्जीवन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आंब्याचे झाड शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. पुनरूज्जीवन केलेल्या झाडामुळे योग्य नियोजन करणे सोपे जाते. पुनरूज्जीवन केलेल्या झाडाची उंची कमी झाल्यामुळे त्या झाडावरील फळांना पिशव्या घालणे सहज सोपे होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेपरच्या पिशव्या फळांना घातल्यावर फळावर उष्णतेचा परिणाम होत नाही. या पिशव्या घातल्याने फळामधील फळामधील साका कमी झाल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचा निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ पोहोचले आहेत. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गेली दोन वर्षे याबाबत संशोधन सुरु आहे. या संशोधनातून चांगला निकाल मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
हापूस आंब्याला पिशवी कधी व कोणत्या प्रकारची घालावी याबाबतचे संशोधन सुरु आहे. परंतु, कागदी पिशवी घातल्याने आंब्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. पेपरच्या पिशवीचे निवड निकालही चांगले आहेत. साधारण गोटी व अंड्याच्या आकाराची फळे झाल्यास त्यावर पेपर पिशवी घालून त्यावर येणारे रोग टाळता येणे शक्य आहे. करपा, चिकटा, बुरशी या रोगापासून बचाव होतो. अवकाळी पाऊस, उष्णता-वाऱ्यापासूनही पिशवीमुळे संरक्षण होते. गळ थांबते, पिशवीतील व पिशवीबाहेरच्या फळाची तुलना केल्यास बाहेरच्या फळावर डाग पडल्यामुळे मार्केटमध्ये अशा फळांना कमी मागणी असते.
परंतु, पिशवीतील फळे आकाराने मोठी, डाग नसलेली उत्तम गुणवत्तेची असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे दीडपट उत्पन्न वाढते. लोकांना साका विरहित उत्तम गुणवत्तेची फळे खायला मिळाल्याने त्याचे समाधानही मिळते.


झाडावरील हापूसला पिशव्या घाला अन्...
कागदी पिशव्या फार खर्चिक नाहीत. त्या कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात. पिशव्या चढवताना मजुरांचा खर्चही फार मोठा नसतो. कारण झाडांची उंची कमी केलेली असल्यामुळे काही मजूर सहजपणे १ तासाला शंभर पिशव्या झाडावरील आंब्याला घालू शकतात.
हापूस आंब्यावरील फळमाशीच्या प्रादूर्भावामुळे युरोप देशांनी आंबा नाकारला होता. त्यामुळे हापूसचे भाव चांगलेच गडगडले होते. परंतु, शास्त्रज्ञांनी आंब्याला पिशवी घातल्यास फळमाशी आंब्यापर्यंत पोहोचत नाही व कागदी पिशवीमुळे फळमाशीचा प्रादूर्भाव टाळता येऊ शकतोे. त्यामुळे आंब्यातील साकी व फळमाशीचा प्रादुर्भाव आंब्यावर घातलेल्या पिशवीमुळे सहज टाळता येणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने जुन्या आंबा बागाचे पुनरूज्जीवन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आंब्याचे झाड हातात येणार आहे. पुनरूज्जीवन केलेल्या झाडामुळे योग्य नियोजन करणे सोपे जाते. या झाडाची उंची कमी झाल्यामुळे त्या झाडावरील फळांना पिशव्या घालणे सहज सोपे होणार आहे. पेपरच्या पिशव्या फळांना घातल्यावर फळावर उष्णतेचा परिणाम होत नाही.

पिशव्या घातल्यामुळे पावसाच्या पाण्याचा थेट आंब्याच्या देठावर परिणाम होत नाही. उन, वारा, उष्णतेपासून रक्षण होते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. औषध फवारणीचा खर्च कमी होतो. गळीचे प्रमाण कमी होते. या सगळ्या गोष्टी २५ पैशाच्या एका पिशवी टाळता येतात. मात्र त्यासाठी आंब्याचे झाड मात्र शेतकऱ्याच्या हातात पाहिजे. आंब्याचे झाड हात आणण्यासाठी मोठ्या जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन होणे महत्वाचे आहे.
- डॉ. पराग हळदणकर,
उद्यान विद्या विभागप्रमुख,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Web Title: Unconscious technique will be recommended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.