कणकवली नगरपंचायत बिल्डरांच्या ताब्यात
By admin | Published: July 10, 2014 12:06 AM2014-07-10T00:06:48+5:302014-07-10T00:08:57+5:30
शैलेश भोगले : मनसेने समस्यांबद्दल मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब
कणकवली : नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार सुरू असून ती बिल्डर्स, ठेकेदार आणि निष्क्रीय नगरसेवकांच्या कह्यात गेल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नसून आंधळं दळतं आणि कुत्रे पीठ खाते अशी स्थिती झाली आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शैलेश भोगले यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, महिला तालुकाध्यक्ष तेजल लिंग्रस, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राणे, उपतालुकाध्यक्ष समीर आचरेकर, शहर अध्यक्ष शैलेंद्र नेरकर, शरद सरंगले, बाळू टिकले आदींनी बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत जाब विचारला.
शैलेश भोगले म्हणाले की, शहरात अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुख्याधिकारी ठेकेदार, बिल्डर्स, नगरसेवकांच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांचे या समस्यांकडे लक्ष नसून त्यांच्याकडून कोणतीही समस्या हाताळली जात नाही. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दोनपैकी एक मशिन बंद पडल्याने शहरात एकाच फॉगिंग मशिनद्वारे डासप्रतिबंधक फवारणी केली जात आहे. फॉगिंग मशिनच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने स्वखर्चातून येत्या आठ दिवसांत दोन फॉगिंग मशिन घेणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शहरातील गटारे ठिकठिकाणी बंद करण्यात आली आहेत. गेली तीन वर्षे भुयारी गटार योजनेसंदर्भात चर्चाच करण्यात येत असून मंजुरी मिळण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर प्रत्यक्षात योजना केव्हा कार्यरत होणार, असा प्रश्न भोगले यांनी केला. शहरातील फेरीवाल्यांकडून पावत्या न देता शुल्क आकारणी करण्यात येत आहे. फेरीवाल्यांची यादी नगरपंचायतीकडे नाही. अनियंत्रीत फेरीवाल्यांमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे.
जलशुद्धीकरण दोन महिने बंद
जलशुद्धीकरण प्रकल्पाची यंत्रणा गेले दोन महिने बंदच आहे. टीसीएल पावडर गेले तीन महिने वापरण्यात आली नाही. ३०० किलो पावडर केंद्रात पडून आहे. पाण्यात किती पावडर टाकायची याचे प्रमाण कर्मचाऱ्यांना माहित नाही. शहरातील ५० टक्के विहिरी संकुलांच्या सांडपाण्याने दूषित झाल्या आहेत.
सीईओ शहराबद्दल अनभिज्ञ
मुख्याधिकारी संतोष वारूळे शहरातील अनेक प्रश्नांबद्दल अनभिज्ञ आहेत. मच्छिमार्केट कुठे आहे याची त्यांना कल्पना नाही. शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भातही सीईओंनी पाहणी केलेली नाही. नियम धाब्यावर बसवून संकुले बांधल्याने सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)