साकेडी फाटा येथे अंडरपासचे काम सुरू : नागवे, करंजेसह दशक्रोशीतील ग्रामस्थांमधून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:47 PM2018-11-28T17:47:53+5:302018-11-28T17:49:17+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्यातील हुंबरटजवळील साकेडी फाटा येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासचे काम अखेर केसीसी बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्यातील हुंबरटजवळील साकेडी फाटा येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासचे काम अखेर केसीसी बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साकेडीसह या मार्गाला जोडणाºया नागवे, करंजेसह दशक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेले दोन दिवस या कामाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यादृष्टीने अंडरपासचे काम करीत असताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे वाहतूक वळविण्यात आली आहे.
साकेडी फाटा येथे चौपदरीकरण आराखड्यात मंजूर असलेला अंडरपास रद्द करण्याबाबत गेल्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरू होत्या. मात्र, याबाबत साकेडी ग्रामस्थांसह नागवे, करंजे दशक्रोशीतील ग्रामस्थ व तीन गावांच्या सरपंचांनी हा अंडरपास रद्द केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी याठिकाणी येत पाहणी करीत साकेडी, करंजे, नागवे ग्रामस्थांसोबत चर्चा केली व संबंधित ठिकाणी अंडरपास मंजूर असल्याने तो रद्द करण्याचे प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याबाबत तीनही सरपंच व ग्रामस्थांना तसे लेखी आश्वासन दिले होते.
मंजूर आराखड्याप्रमाणे काम करण्याची मागणी
दरम्यान, हुंबरटमधील महामार्गालगत येत असलेल्या काही व्यापारी व ग्रामस्थांनी अंडरपास रद्द करून त्याठिकाणी भुयारी मार्ग किंवा सर्कल ठेवण्याची मागणी करीत अंडरपासच्या कामाला विरोध केला होता. त्यानंतर काहीवेळा हे काम बंदही पाडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली होती. तसेच साकेडी ग्रामस्थांशी याबाबत चर्चा केल्यानंतरच अंडरपास रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साकेडी ग्रामस्थ व सरपंच हे आपल्या मागणीप्रमाणेच व मंजूर आराखड्याप्रमाणेच काम करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर या अंडरपासचे काम सुरू करण्यात आले आहे.