शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:00 PM2020-02-21T13:00:04+5:302020-02-21T13:03:14+5:30
शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.
वैभववाडी : शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला फक्त तलवार दिसते. मात्र या तलवारी पलिकडचे आणि तलवारीमागचे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा राज्याभिषेक आपण समजून घेतल्याशिवाय त्यांचे चरित्र आपण समजून घेऊ शकत नाही. त्यांनी आपल्या राज्यात शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, असे बंडगर महाराज पुढे म्हणाले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सत्यशोधक सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचारवैभव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतकुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बंडगर महाराज यांनी मत मांडले.
बंडगर महाराज पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाजांचा संघर्ष कोणत्या एका जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नव्हता. म्हणूनच सर्व जाती, धर्माचे लोक त्यांच्यासाठी स्वत:चा जीव द्यायला तयार असत. तसेच त्यांच्यावर संत परंपरेचा प्रभाव होता.
महारांच्या स्वराज्याची तात्विकता ही संत परंपरेची आहे. तत्कालीन वतनदारीला वेसन घालून वतनदारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या रयतेला मुक्त केले. आजच्या वतनदारांनाही बंगला, गाडी सर्व सेवा सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा टोला राजकर्त्यांना लगावत त्यांनाही आपण याबाबत जाब विचारला पाहीजे.
महाराजांनी आपल्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली. गुलामाच्या व्यापारावर बंदी घातली. सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी देऊन स्वराज्यामध्ये जातीय सलोखा निर्माण केला. मात्र तत्कालीन काही उच्चवर्णीयांना ते पटले नाही. त्यांनी महारांजाच्या विरोधात कटकारस्थाने केली. त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. महाराजांचे स्वराज्य आपल्याकडे कसे येईल यासाठी प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील समतेचे अंगीकार केला असता; तर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आलेच नसते. असे ही बंडगर महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान समजून घेत त्यांचा वारसा आपण जोपासला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले. तर राजेश कळसुलकर यांनी आभार मानले.