गणेशोत्सवानिमित्त एसटी सेवा पूर्ववत करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:49 PM2020-08-13T17:49:37+5:302020-08-13T17:51:52+5:30
गणेशोत्सवानिमित्त येणार्या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली : गणेशोत्सवानिमित्त येणार्या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री,वागदे माजी सरपंच संदीप सावंत,सचिन पारधीये,स्वप्नील चिंदरकर,अभय गावकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एसटी वाहतुक मोठ्या प्रमाणात बंद झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे. तथापि आता गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असल्याने ग्रामीण भागातील भाविकाना खरेदीसाठी तसेच दैनंदिन व्यवहारासाठी सतत तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच अनेक भाविक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील असल्याने त्याना तालुक्याच्या ठिकाणाहुन त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सध्या कोणतीही सोय नाही. त्यामुळे त्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामीण भागातील एसटीची बससेवा पूर्वीप्रमाणेच सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करुन सुरु करण्यात यावी. जेणेकरुन ग्रामीण भागातील लोकांचे हाल होणार नाहीत. या सर्व बाबींचा विचार करुन संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक आगारातुन ग्रामीण भागात जाणार्या बसफेर्या नियमांचे पालन करुन पुर्वीप्रमाणेच सुरु कऱण्याचे आदेश निर्गमीत करण्यात यावेत. अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली.