अशैक्षणिक कामाचा विद्यार्थ्यांवर बोजा?

By admin | Published: December 9, 2014 01:21 AM2014-12-09T01:21:39+5:302014-12-09T01:23:45+5:30

विद्यार्थी त्रस्त : विद्यार्थ्यांकडून अनेक कामांची अंमलबजावणी

Unemployed workload to students? | अशैक्षणिक कामाचा विद्यार्थ्यांवर बोजा?

अशैक्षणिक कामाचा विद्यार्थ्यांवर बोजा?

Next

एजाज पटेल -फुणगूस -शासनाकडून शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी विविध योजना राबविल्या जात असताना शाळेतील अशैक्षणिक कामे विद्यार्थ्यांनाच करावी लागत आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
एका बाजूला गुणवत्ता विकास प्रकल्प राबविला जात असताना दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील स्वच्छता, व्हरांडा, परिसराच्या स्वच्छतेसाठी राबविले जाते. हा विरोधाभास शासनाच्या ध्यानी येत नाही का? असा प्रश्न पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षकांनासुद्धा शैक्षणिक कार्याबरोबरच अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात करावी लागत असल्याने शिक्षकांमध्येही नाराजी आहे. प्राथमिक शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत यापूर्वी अनेकवेळा अनेक चर्चा झाल्या, आंदोलने झाली. शिक्षक संघटना ही कामे कमी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, शाळेतील मुलांना शाळेच्या आवारात कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत चर्चा झालेली दिसून येत नाही.
प्राथमिक शाळांमध्ये शिपाईपद भरण्यात न आल्याने शिपायाची सर्व कामे या लहान मुलांकडून करुन घेतली जातात. शाळांच्या खोल्या व्हरांडा व परिसराची झाडलोट करणे, ही मुलांच्या दृष्टीने नित्याचीच कामे झालेली आहेत. ग्रामीण भागामध्ये तर शाळेच्या खोल्या, व्हरांडा या विद्यार्थ्यांकडून सारवून घेतला जातो. मग, त्यासाठी शेण जमविण्यापासूनचे काम विद्यार्थ्यांना करावे लागते. काही शाळेमध्ये नळपाणी योजना नाही. ज्या शाळांमध्ये नळपाणी योजना असून, त्या डबघाईला आल्या आहेत, अशा ठिकाणी तर मुलांना पाणी भरण्याचे कामही करावे लागते. हे सर्व करण्यासाठी मुलांचा अर्धा ते एक तास वाया जातो.
प्राथमिक शाळांसाठी शिपाईपद नाही. त्यामुळे ही कामे मुलांकडून करुन घेण्यात काहीही गैर नाही, असे शिक्षकांना वाटते. राज्य शासनानेही यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. एकीकडे गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रकल्प व दुसरीकडे मुलांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त जात आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी पालकवर्गातून जोर धरु लागली आहे.

Web Title: Unemployed workload to students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.