एक दिवस शाळेसाठी उपक्रम अविस्मरणीय!
By Admin | Published: July 7, 2016 11:37 PM2016-07-07T23:37:33+5:302016-07-08T01:03:28+5:30
३९१ शाळा : नांदगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट
सिंधुदुर्गनगरी : एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३९१ शाळांमधून राबविण्यात आला. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी शाळेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंंह यांनी मालवण तालुक्यातील शिरवंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे भेट दिली. जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांनी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम अविस्मरणीय केला.
समाजातील सर्व घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा वृध्दींगत होण्यासाठी मौलिक सूचना करणे, शालेय पोषण आहार योजनेतील भोजनाचा दर्जा तपासणे, शाळांतील त्रृटींचा आढावा घेणे व उपाययोजना सूचविणे, बालकांशी समरस होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीसाठी उपाययोजना सूचविणे, पटांगण, ग्रंथालय, स्वच्छता गृह आदी सुविधांची पाहणी करणे, शालेय पाठ्यक्रमातील विषयांखेरीज विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढीसाठी वर्गनिहाय मार्गदर्शन करणे आदी बाबत आजच्या या उपक्रमांतर्गत अधिकारी वर्गाने नेमून दिलेल्या शाळांचा दिवसभर आढावा घेतला.
शाळा भरताना सुरवातीस सादर होणारे राष्ट्रगीत, पाठ, वृत्तपत्र वाचन, दिनविशेष याच बरोबर समुहगान, दुपारच्या सत्रात पटांगणावर सादर केलेले क्रीडा प्रकार, स्वच्छ परिसर, परिसरातील वृक्ष लागवड, वर्ग शिक्षकांची शिकवितानाची तन्मयता, विद्यार्थांशी विषयानुरुप साधलेला संवाद, विद्यार्थी वर्गाचे चिकित्सक प्रश्न, अंगभूत असलेल्या गुणांचे सादरीकरण या सर्व बाबींमुळे बहुतांशी अधिकारी वर्ग प्रभावित झाले. वर्गावर तासिका घेण्याचा अनुभव अत्यंत सुखद होता.
बऱ्याच वर्षांनी लहान विद्यार्थी होण्याचा अनुभव व या विद्यार्थ्यांशी वेगळ्या विषयांवर संवाद साधण्याची अनुभूती आनंददायी होती अशी प्रतिक्रियाही एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या अधिकारी वर्गाने व्यक्त केली. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा टप्पा २१ जुलै २०१६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दुसरा टप्पा :२१ जुलैला
एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा टप्पा २१ जुलै २०१६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.