धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

By admin | Published: June 8, 2015 10:15 PM2015-06-08T22:15:42+5:302015-06-09T00:10:59+5:30

चिपळूण तालुका : ४० लाख रूपये खर्च करून राबविलेली योजना निकृष्ट

Unhealthy water for Dhanagarwad .. | धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

Next

अडरे : चिपळूण तालुक्यातील तळसर, अनारी, कुडप व डेरवण येथील धनगरवाड्यांकरिता भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याने या योजनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश राजेशिर्के, उपसरपंच दत्ताराम राजेशिर्के, सखाराम ढेबे, बाबू बोडेकर, भाऊ हिरवे, धोंडू खरात, रामचंद्र बावदाने, यशवंत वरक, संतोष बावदाने, चंद्रकांत कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपाणी योजना राबवूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत चार गावातील धनगरवाड्यांसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच ही योजना अयशस्वी ठरली असून, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. ही नळपाणी योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत संयुक्त कमिटीने तळसर, अनारी, कुडप, डेरवण राजवाडी धरणातून पाणी उचलून राबविण्यात आली. १६ एप्रिल २००९ला कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१० पर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, ३ वर्ष हे काम उशिरा करण्यात आले. या योजनेबाबत १ जूनला ग्रामस्थांनी उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र, पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाचे जंगम यांच्याबरोबर ग्रामस्थ व ठेकेदार यांची चर्चा करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन खोदकामासाठी २ लाख १७ हजारचे बिल अदा केले आहे. २ हजार ४०० मीटर लांबी, २ बाय २ ची खोदाई केली आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासकीयस्तरावर सखोल चौकशी करण्यासाठी त्रीस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रूपये खर्च करून नळपाणी योजना गावात राबवल्या जातात. मात्र, योजनेचे काम करताना ते सुयोग्य पध्दतीने केले नाही तर अशा योजनांचा बोजवारा उडतो हे अशा प्रकारातून सिध्द होते आहे. संबंधित योजनेतील संबंधितांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)

तळसर, अनारी, कुडप व डेरवण नळपाणी योजनेची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी.
अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याचा तळसर भागातील ग्रामस्थांचा आरोप.
चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यास कोण जबाबदार.

Web Title: Unhealthy water for Dhanagarwad ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.