जमिनी न देण्याचा एकमुखी ठराव

By admin | Published: July 10, 2014 12:05 AM2014-07-10T00:05:05+5:302014-07-10T00:10:44+5:30

कासार्डे ग्रामस्थांची बैठक : एमआयडीसी प्रकल्पाला विरोध

The unilateral resolution of not giving land | जमिनी न देण्याचा एकमुखी ठराव

जमिनी न देण्याचा एकमुखी ठराव

Next

नांदगांव : कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी कासार्डेसह अन्य चार महसुली गावांमध्ये भूसंपादनासाठी भूधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु करण्यात आली. मात्र कासार्डेतील एकाही भूधारकाने नोटीस न स्वीकारता बुधवारी ग्रामस्थांनी सभा बोलावली. त्यामध्ये या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित जमिनी देणार तर नाहीच शिवाय नोटीसाही स्वीकारू नयेत असे ठरविण्यात आले. यावेळी हंगामी समिती नेमण्यात येवून १२ जुलैला पुन्हा सभा होईल. त्या सभेत पुढील दिशा स्पष्ट होईल. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून तीव्र विरोध आहे.
कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी एकूण २३०० हेक्टरपैकी पहिल्या टप्प्यातील कासार्डे, जांभूळगाव, दाबगाव, उत्तर-दक्षिण गावठण व नाग सावंतवाडी या पाच महसुली गावांतील एकूण १७०० हेक्टर जमिनीचे संपादनाची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील एकूण १० हजार नोटीसांचे वितरण करण्यात आले. मात्र, कासार्डेतील एकाही ग्रामस्थाने नोटीस न स्वीकारता या प्रकल्पाला विरोध असल्याचे दर्शविले. बुधवारी सकाळी महालक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या सभेसाठी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीपत पाताडे, सरपंच संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य संजय देसाई यांची अनुपस्थिती दिसून आली. यावेळी ग्रामस्थांनी नोटीसा न स्वीकारता आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देऊ नयेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरीदेखील ग्रामस्थांनी तयार असल्याचे ठरविण्यात आले. तसेच यावेळी हंगामी समिती नेमण्यात आली.
एका पक्षाच्या बाजूने लोक
आजच्या कासार्डे ग्रामस्थांच्या सभेबाबत संघर्ष समिती अध्यक्ष श्रीपत पाताडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याला आजच्या सभेबाबत माहितीच नसून कोणी सांगितलेही नाही. मात्र, आम्ही गावासोबत आहोत असे सांगतानाच एका पक्षाच्या बाजूनेच लोक होते, असेही पाताडे यांनी सांगितले.
दरम्यान, आजच्या सभेला ९० लोक उपस्थित राहिले होते. त्यात या प्रकल्पाविरोधात संघर्ष करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर १२ जुलैला सकाळी ११.३० वाजता महालक्ष्मी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांबाबतची सद्यस्थिती, या प्रकल्पाविरोधात पुढील ध्येय धोरणे तसेच इतर कायदेशीर कारवाईबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याबाबत कासार्डे तलाठी जाधव यांना पुढील कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले की, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पाबाबत पाच महसुली गावातील एक प्रतिनिधी याप्रमाणे डॉ. अरविंद कुडतरकर (दाबगाव), श्रीरंग पाताडे (द. गावठण), डॉ. संतोष राणे (धारेश्वर कासार्डे), सदानंद सावंत (धारेश्वर), दशरथ सावंत (नागसावंतवाडी), बाळाराम तानवडे (जांभूळगाव) यांची नेमणूक करण्यात आली. या दोन दिवसांत प्रत्येक वाडीची सभा होऊन त्यानंतर १२ जुलैच्या सभेत अंतिम संघर्ष समिती तयार करण्यात येईल असे आजच्या सभेत ठरविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The unilateral resolution of not giving land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.