राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 27, 2023 06:37 PM2023-11-27T18:37:05+5:302023-11-27T18:37:28+5:30

मागील घटना, घडामोडींवर पडदा

Union Minister Narayan Rane was met by School Education Minister Deepak Kesarkar after 14 years | राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर तब्बल १४ वर्षांनंतर भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचे केसरकर आणि राणे यांनी सांगितले असले तरी मागील १४ वर्षांत राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय विरोध आता मावळला असून आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील चित्र वेगळेच दिसणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

सन २००९ साली मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर सिंधुदुर्गमधील विधानसभेचा एक मतदार संघ कमी होऊन तीन नव्याने मतदार संघ झाले. त्यात कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तीन तालुक्यांसाठी कणकवली मतदार संघ. कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांसाठी कुडाळ मतदार संघ आणि सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी सावंतवाडी मतदार संघाची निर्मिती झाली होती.

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. त्यावेळी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. या निवडणुकीत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंची भेट घेऊन त्यांच्या कृपाशीर्वादानेच आणि पाठिंब्यांमुळे केसरकर पहिल्यांदा आमदार झाले होते.

त्यानंतर मात्र, २०१४ आणि २०१९ च्या दोन निवडणुकांमध्ये केसरकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली. राणेंशी राजकीय वैर पत्करून त्यांनी त्यांच्या धेय धोरणांना वेळोवेळी विरोध करत या दोघांमध्ये टोकाचे राजकीय संघर्ष जिल्हावासीयांनी अनुभवले आहेत. या १४ वर्षांच्या कालावधीत केसरकर जरी दोन वेळा आमदार झाले असले, तरी त्यांच्या मतदार संघातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नारायण राणेंनीच बाजी मारली होती.

भाजप, शिंदे सेनेमुळे दिलजमाई

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ४० आमदारांसह भाजपाशी संधान बांधून भाजप शिंदे सेना यांचे एकत्रित सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये दीपक केसरकर हे शिंदे सेनेत मंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रवक्ते झाल्याने आता युतीचा धर्म म्हणून केसरकर यांना भाजपाकडून केंद्रात मंत्री असलेल्या राणेंशी जमवून घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर आणि राणे एकत्र येण्याची चाहूल लागली होती.

मागील घटना, घडामोडींवर पडदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण आता १४ वर्षांनंतर त्याच वळणावर येऊन पोहोचले आहे. केसरकर यांना राणेंची गरज वाटू लागली. त्यामुळे राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गचा विकास करणार असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा मागील सर्व घटना, घडामोंडीवर पडदा टाकला आहे.

Web Title: Union Minister Narayan Rane was met by School Education Minister Deepak Kesarkar after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.