भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
By अनंत खं.जाधव | Published: August 13, 2022 06:23 PM2022-08-13T18:23:30+5:302022-08-13T19:08:23+5:30
विरोधी पक्षच 'अशा' अफवा पसरवत असतो
सावंतवाडी : ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहेत. त्यांची चौकशी भाजपात आल्यावर कुठे थांबणार नाही. कोट्यावधीचे भ्रष्टाचार करायचे आणि ईडीने कारवाई केल्यानंतर आम्ही चोरी केली नाही असं सांगायचे. मग महाराष्ट्रात खासदारासह माजी मंत्री जेलमध्ये कसे गेले असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री मिश्रा म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण एकही मंत्र्यावर आरोप झाला नाही. मात्र काही राज्यात विरोधी पक्षाची सत्ता आहे तेथे अनेक मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या आरोपात अडकले आहेत. ज्याच्यावर कारवाई होते ते भाजपच्या नावाने ओरड मारतात मग चोरी कशासाठी करायची असा सवाल केला. तर ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्याची कुठेही चौकशी थांबणार नसल्याचेही ते म्हणाले. भाजपकडे आले म्हणून चौकशी थांबतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणालाही चौकशीवर संशय असेल किंवा समाधानी नसाल तर यंत्रणे विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षच अशा अफवा पसरवत असतो
भाजपमध्ये गेल्यावर नेते सुटतात असे सामान्य माणूस म्हणत नाही, त्यांना काही देणे घेणेही नसते. पण विरोधी पक्षच या अफवा पसरवत असतो. कोणी कितीही ओपनिय पोल काढू दे पण राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि पुन्हा राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'हे' कितपत योग्य
राज्यात निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करायची आणि नंतर ज्याच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत सरकार बनवायचे हे कितपत योग्य आहे. आताचे शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत असून ते यापुढे ही चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, महेश सारंग, शैलेंद्र दळवी, मनिष दळवी, संजू परब लखमसावंत भोसले, राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.