मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्री राणे ठरले असमर्थ - वैभव नाईक 

By सुधीर राणे | Published: August 16, 2023 05:09 PM2023-08-16T17:09:33+5:302023-08-16T17:10:03+5:30

विकासासाठी कायम सहकार्य 

Union Minister Rane unable to repair Mumbai-Goa highway says MLA Vaibhav Naik | मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्री राणे ठरले असमर्थ - वैभव नाईक 

मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्री राणे ठरले असमर्थ - वैभव नाईक 

googlenewsNext

कणकवली:  श्री गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई -गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता सुस्थितीत न आल्यास चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास धोकादायक बनणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले होते. हा महामार्ग केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे उर्वरित महामार्गाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरले आहेत असा टोला कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे. 

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे खड्डेमय झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र,त्यांच्यावर नारायण राणेंना विश्वास नसल्याने राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली. 

गेले दीड वर्षे रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. परंतु राणेंनी अद्यापही त्यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही. आपल्या मुलाला मंत्री बनवून पालकमंत्री करण्यासाठी राणेंनी लॉबिंग केली होती. मात्र, ती फेल ठरल्याने जिल्ह्यात भाजप विरहित आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राणेंची  धडपड सुरु आहे. त्यामुळे नारायण राणेंची रविंद्र चव्हाण यांच्याबाबतीत असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर येत आहे. 

विकासासाठी कायम सहकार्य 

मंत्री चव्हाण यांनी मंजूर केलेली विकासाची कामे रखडविण्यासाठी राणे पडद्यामागची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे एकंदर  जिल्ह्याच्या विकासाचा खेळ सुरु आहे. राणेंनी आपल्याच भाजप पक्षाच्या पालकमंत्र्यांवर विश्वास न ठेवल्यास जनता आणि विरोधक तरी विश्वास कसे ठेवतील? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करत पालकमंत्र्यांना  जिल्ह्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य राहील असेही म्हटले आहे. 

..त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती का?

राणे पिता पुत्र हे महामार्गावरील टोलनाक्याचा ठेका मिळवून टोल वसुली सुरू करण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यामुळे टोलनाक्यासाठीच राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती का? अशीही शंका लोकांच्या मनात उपस्थित होत असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Union Minister Rane unable to repair Mumbai-Goa highway says MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.