दर्पणकारांना दिली अनोखी मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:34 PM2021-01-08T14:34:11+5:302021-01-08T14:38:56+5:30
Journalist Pombhurle Ratnagiri-कुठलीही चांगली कला माणसाच्या अंगात असली की ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी त्यांची त्याला तमा नसते. त्यावरती मात करून आपली कला जोपासनाचा प्रयत्न तो कलाकार करीत असतो. याचा प्रत्यय अक्षय मेस्त्रीच्या बाबतीत आला.
तळेरे : कुठलीही चांगली कला माणसाच्या अंगात असली की ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी त्यांची त्याला तमा नसते. त्यावरती मात करून आपली कला जोपासनाचा प्रयत्न तो कलाकार करीत असतो. याचा प्रत्यय अक्षय मेस्त्रीच्या बाबतीत आला.
एका विचित्र अपघातात मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या गवाणेतील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सुबक कलाकृती आपल्या चित्रकलेच्या कुंचल्यातून साकारून दर्पणकारांना अनोखी मानवंदना दिली.
चार दिवसांपूर्वी गवाणेहून तळेरेला दुचाकीने येत असतांना गवाणे येथे समोरून येणाऱ्या क्रेनची अक्षय मेस्त्री या युवा चित्रकाराच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातानंतर अक्षयला तळेरे येथे जखमी अवस्थेत आणण्यात आले. त्यात त्याच्या पायाला गंभीर मार लागून खूप रक्तस्त्राव झाला होता. तसेच त्याचा पाय जायबंदी झाला.
यानंतर त्याला तळेरे येथे प्राथमिक उपचार करून कणकवली येथील डॉ. नवरे यांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पायाला प्लास्टर घालण्यात आले. त्यानंतर रुग्णालयामधून घरी आल्यावर त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाला पत्रकार दिनादिवशीच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे कॅनव्हासवरती रेखाटलेले सुंदर चित्र भेट म्हणून देण्याचे निश्चित केले होते. मात्र त्याचा अपघात झाल्याने आपली इच्छा अपूर्ण राहते की काय असे त्याला वाटू लागले. पण त्याच्यातील कलाकार पुन्हा जागृत झाला. त्याची कला त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
दुखण्यावरही मात केली
बेड रेस्ट असतानाही व खाली बसता येत नव्हते तरीदेखील बिछान्यावर प्लास्टर घातलेला पाय घेऊन बसत आपल्या दुखण्यावरती मात करीत अक्षयने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सुबक कलाकृती साकारली. त्याच्या कलेला आणि जिद्दीला सलामच द्यावा लागेल. आपल्यातील हाडाचा कलाकार शांत राहूच शकत नाही. हेच त्याने पुन्हा एकदा आपल्या कलेतून सिद्ध करून दाखविले.