ऐक्याची सुरुवात चिपळूणपासून...

By Admin | Published: March 30, 2015 09:44 PM2015-03-30T21:44:32+5:302015-03-31T00:29:53+5:30

फेरफटका...

Unity starts from Chiplun ... | ऐक्याची सुरुवात चिपळूणपासून...

ऐक्याची सुरुवात चिपळूणपासून...

googlenewsNext


चिपळूण तालुक्यात रिपब्लिकन पार्टीच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन दि. २५ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. रिपाइंतील गटातटाच्या भिंती बाजूला सारुन घडलेले ऐक्य हे अनेकांना स्फूर्ती देणारे आहे. मध्यंतरीच्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्रीय नेते राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांनी ऐक्याचा हात पुढे केल्यास प्रथम प्रतिसाद देऊन असा घोष सुरु ठेवला होता. त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या दहा संघटनांनी एकत्र येऊन आंबेडकर जयंती हा ऐक्याचा सोहळा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मोठ्या संघटनांमध्ये, नेत्यांमध्ये विचारभेद, मतभेद, धोरणातील भेद असे प्रकार असताना सर्व संघटनांचे सूत्र असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना कृतज्ञतेपोटी सर्वांनी एकत्र येऊन हा एल्गार करायचे ठरवले आहे. याबद्दल सर्व संघटनांचे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचेही अभिनंदन करावे लागेल.
कोकणात आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, बि. सी. कांबळे, आनंदराज आंबेडकर, माई आंबेडकर व या चळवळीतील अभ्यासू नेते प्रभाकर जाधव, बौद्धजन हितसंरक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शीलभद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जी मेहनत घेतली जात आहे, ती स्तुत्य आहे. या पक्षात निष्ठेने काम करणारी मंडळी आहेत. हाक मारल्यानंतर महासागर वाटावा, अशा पद्धतीने एकत्र होण्याची किमया ही मंडळी साधू शकते. याचा प्रत्यय अनेक कार्यक्रमांमधून आला आहे. आता तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती पुण्यपावन आदर व्यक्त करण्यासाठी केवळ भीमसागरच नव्हे; तर सर्व जाती धर्मातील लोक चिपळूणमध्ये एकवटणार आहेत. हा ऐक्याचा प्रथम अध्याय रिपाइंसाठी चिपळूणने प्रथम सुरु केल्याचे दिसत आहे. आठवले, आंबेडकर, गवई, कवाडे व अन्य मंडळींनी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून ऐक्याच्या मुद्द्यावर जनतेला आवाज दिला होता. मात्र, प्रत्यक्षात ही मोट काही केल्या बांधली जात नव्हती. त्यामुळे अनेक मतमतांतरे यानिमित्ताने मांडण्यात आली होती. बौद्ध धर्माचे अभ्यासक माजी न्यायमूर्ती थूल यांनी दोन वर्षांपूर्वी कोकणामध्ये प्रबोधनात्मक व्याख्याने दिली होती. बौद्ध धम्म व त्यांचे महत्व, इतिहास आजच्या काळात त्याची गरज, त्यानुसार निर्माण झालेले कायदे, पंचशील या साऱ्याचा उहापोह या व्याख्यानातून मांडण्यात आला होता. त्यांच्या दौऱ्याला व या कार्यक्रमाला कोकणातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यावेळीही एका विचारात आल्यानंतर परिवर्तन अशक्य नाही, असा नारा देत या मंडळींनी एकत्रिकरणाची पायरी रचली होती. त्याचाच अध्याय आता पुढे सुरु झाला आहे.
चिपळूणमध्ये बहाद्दूरशेख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी परिसराचे सौंदर्यीकरण व एक आदर्श असे स्मारक यानिमित्ताने प्रेरणा देणारे ठरावे, अशी कल्पना त्यावेळी मांडण्यात आली. चारही दिशांना जाणाऱ्या पांथस्तांना दिशादर्शी वाटावे, अशा पद्धतीचे प्रबोधन यानिमित्ताने घडत असते. आंबेडकर पुण्यतिथी, जयंती याव्यतिरिक्त अनेक कार्यक्रमांतून या स्मारकाला अभिवादन केले जाते. त्यानिमित्ताने तो परिसर झळाळून निघतो. यानिमित्ताने २५ एप्रिलला संपूर्ण चिपळूण शहरातील सर्व मार्ग निळाईने झळाळी आणते. शांतता, संयम व अंहिसा या तीन तत्त्वाचा अंगिकार आजच्या पिढीने करावा, यासाठी बुद्धाने प्रेरणा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण विचार व कृती जगाला ज्ञान देणारी ठरली. यानिमित्ताने अशा सोहळ्याला हजारोंची उपस्थिती असणारच आहे. मात्र, त्याहीपेक्षा तरुण पिढीला ऐक्याचे महत्व कोकणात किती पटले आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. सर्व संघटनांना एकत्र करण्यात किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एकत्र आणण्यामागे कष्ट आहेत. ते कष्ट उचलण्याची तयारी येथील तरुणांनी दाखवली. राष्ट्रीय नेत्यांसाठी अथवा आजच्या पिढीला ज्यांच्याकडून प्रबोधनाच्या अपेक्षा आहेत, अशा नेत्यांनाही या कृ तीचे समर्थन केल्याखेरीज राहवणार नाही. अनेक चळवळींचा इतिहास असलेल्या या शहराने आणखी एका वेगळ्या ऐक्याची परंपरा यानिमित्ताने दाखविण्याचे ठरविले आहे. समस्त चिपळूणकर याचे स्वागत केल्याखेरीज राहणार नाहीत.
- धनंजय काळे

Web Title: Unity starts from Chiplun ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.