अज्ञात आजाराने शेळ्या दगावल्या
By admin | Published: June 21, 2017 12:25 AM2017-06-21T00:25:26+5:302017-06-21T00:25:26+5:30
नुकसान भरपाईची मागणी : मेंढपाळ व्यावसायिकांत खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कडावल : किनळोस येथील शेतकऱ्याचे तीन नर बोकड व एक शेळी अज्ञात रोगामुळे सोमवारी दगावले. पूर्ण वाढ झालेल्या या जनावरांची किंमत सुमारे साठ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चार शेळ्या एकाचवेळी दगावल्यामुळे गावातील मेंढपाळ वर्गात खळबळ माजली आहे.
किनळोस येथील अर्जुन सावंत व त्यांच्या कुटुंबीयांचा शेळीपालनाचा जोडधंदा आहे. मागील तीन पिढ्यांपासून हे कुटुंब पारंपरिक शेळीपालन करत आहे. सावंत हे रोजच्याप्रमाणे सोमवारी आपल्या शेळ््यांना चरविण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. सायंकाळपर्यंत सर्व शेळ््या सुरक्षित होत्या. मात्र, सायंकाळी घरी परतल्यानंतर काही शेळ््या अचानक अत्यवस्थ झाल्या. त्या चालताना तोल जाऊन पडू लागल्या.
काही वेळ त्यांच्या शरीराला कंप सुटला व थोड्याच वेळात चार शेळ््या गतप्राण झाल्या. मृत झालेल्या चार शेळ्यांपैकी तीन पूर्ण वाढ झालेले विक्रीयोग्य नर बोकड, तर एक मादी होती. पूर्ण वाढ झालेल्या या चार बोकडांची किंमत सुमारे साठ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळपातील चार शेळ्या अचानक दगावल्यामुळे सावंत कुटुंबीय हवालदिल झाले आहे. किनळोस गाव अतिशय डोंगराळ असून येथील भौगोलिक परिस्थिती शेळीपालनास अनुकूल असल्याने या गावातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वापारपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. मटणासाठी बोकडाला असलेली मागणी व मिळणाऱ्या बाजारभावामुळे काही नवीन तरूणही या व्यवसायाकडे आकर्षित झाले असून, त्यांनीही जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध रोगांमुळे शेळ््या मृत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: पावसाळ््याच्या दिवसात अचानक आजार उद्भवून शेळ्या तडकाफडकी मृत होण्याचे प्रकार वाढत आहेत.
विविध आजारांमुळे शेळ््या-मेंढ्या दगावत असताना दुसरीकडे बिबटे व कोळसुंद्यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांची वक्रदृष्टीही या व्यवसायावर पडत आहे. बिबटे व कोळसुंद्यांनी गेल्या काही वर्षात येथील मेंढपाळांच्या शेकडो शेळ््या-मेंढ्या फस्त केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी याच नुकसानग्रस्त कुटुंबाच्या मालकीच्या सतरा शेळ््या कोळसुंद्यांनी एकाच वेळी ठार केल्या होत्या आणि आता पुन्हा चार शेळ््या अचानक दगावल्यामुळे सावंत कुटुंब हतबल झाले आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे गावातील मेंढपाळवर्गात खळबळ माजली आहे.