rain in sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी
By सुधीर राणे | Published: November 28, 2022 06:48 PM2022-11-28T18:48:23+5:302022-11-28T18:48:48+5:30
पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत
कणकवली: कणकवलीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही ठिकाणी आज, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ऐन हिवाळ्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत आहेत. पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेली दोन दिवस थंडी गायब झाली आहे. तसेच वातावरणातील उष्णतेचे प्रमाण देखील वाढले होते. आज, सोमवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास कणकवलीत अचानक वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
फोंडाघाट येथे आज, आठवडा बाजार असतो. अचानक आलेल्या पावसाने बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्राहकांनाही पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचा आसरा घ्यावा लागला. महामार्गाच्या उड्डाणपूलावरून सर्व्हिस रस्त्यावर धबधब्या सारख्या पाण्याच्या धारा कोसळत होत्या. तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचले होते. त्यातून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती.
अन्य तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.