सिंधुदुर्गात अवकाळी वादळी पावसाचा शिडकावा, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:03 PM2024-11-15T12:03:59+5:302024-11-15T12:04:30+5:30
भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात
सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि काही जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार कणकवली तालुक्यातील जानवली व काही भागात गुरूवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला.
या पावसासोबत वादळी वारेदेखील वाहत असल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या वादळी पावसाचा जाेर काही मिनीटातच आटोपला. ज्याठिकाणी ढग आले होते. तेथे हा पाऊस पडला. मात्र, तो संततधार बरसला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात
सध्या भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे भातकापणीचा हंगाम लांबला आहे. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. उष्णतेचे प्रमाण अचानक वाढले होते. तर गुरूवारी सकाळपासूनच थंडी गायब झाली होती आणि ढगाळ वातावरण होते.
आता पाऊस थांबून कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा
यावर्षी पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.