..तोपर्यंत बील भरणार नाही
By admin | Published: August 3, 2015 11:44 PM2015-08-03T23:44:39+5:302015-08-04T00:03:24+5:30
कवठणी ग्रामस्थांचा मोर्चा : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा
कुडाळ : जोपर्यंत कवठणी गावातील सर्व विद्युत मीटरांची तपासणी केली जात नाही व येथील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील समस्या सोडवून वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही, तोपर्यंत कवठणी गावातील कोणताही ग्राहक वीजबिल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा कवठणी येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी घेतला. कुडाळ येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी घेत मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण कवठणी गाव येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही यावेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील गेले कित्येक महिने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिल येत आहे. तसेच विद्युत खांब बदलण्याकरिता गावात खड्डे मारण्यात आले. मात्र, विद्युत खांब अजूनही टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये जनावरे पडण्याची तसेच मानवी जिवितास धोका निर्माण झाला आहे. गावात अनेकवेळा विद्युत पुरवठा सुरळीत नसतो. काही ठिकाणी विद्युत तारा खाली आलेल्या आहेत. ज्याठिकाणी धोकादायक वी खांब आहेत, ते खांब बदलण्यात आलेले नाहीत. गावात वायरमन नाहीत. अशा अनेक समस्यांमुळे कवठणी ग्रामस्थ त्रस्त आहेत. या समस्यांमुळे येथील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिलामुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे. या सर्व समस्यांबाबत कवठणी येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी वारंवार येथील एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा कळविले. मात्र, या सर्व समस्यांकडे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. यामुळे कवठणी गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी कुडाळ येथील एमएसईबीच्या जिल्हा कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात कवठणीचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, कवठणी सरपंच सुमन कवठणकर, सावंतवाडी काँग्रेस उपतालुकाध्यक्ष शेखर गावकर, कवठणी उपसरपंच नीतेश कवठणकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, आनंद शिरवलकर, रुपेश पावसकर, राकेश कांदे, सद्गुरू कवठणकर, अजित कवठणकर, प्रकाश कवठणकर, रवींद्र कवठणकर तसेच कवठणी गावातील सुमारे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने वीज वितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. बांबळे यांची भेट घेतली व कवठणी गावातील विद्युत पुरवठा, वाढीव बिलासंदर्भात चर्चा केली.
यावेळी सुधन कवठणकर यांनी वाढीव बिल तपासावे, नवीन विद्युत खांब लावावेत, पाणथळ जमिनीतील धोकादायक खांब बदलावेत, वायरमन दोन दिवसात द्यावा, काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तीन महिन्यांनी वीज बिले द्यावीत, अशा मागण्या यावेळी कवठणी ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केल्या.
शेवटी अधिकारी बांबळे व सहाय्यक व्यवस्थापक रोहिदास राऊत यांनी कवठणी गावच्या सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन
दिले. (प्रतिनिधी)
सातार्डा की, कवठणी यावरून वादंग
यावेळी सातार्डा येथील बंद पथदीपांचे काम अगोदर करा, असे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर माजी सरपंच सुधा कवठणकर यांनी प्रकाश कवठणकर यांना विरोध करत सातार्ड्यात नाही, तर अगोदर कवठणी येथील पथदीपांचे काम करा. त्यांचे सरपंच, उपसरपंच बोलावूनही आले नाहीत. त्यामुळे कवठणीच्याच पथदीपांचे काम अगोदर करा, असे सांगितले. यावरून प्रकाश कवठणकर व सुधा कवठणकर यांच्यात अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातच वाद झाले.
आता बेमुदत उपोषण
क ोकणात वीजचोरी नाही, वीज बिल वसुली १०० टक्के असूनही वीज वितरण कंपनी व अधिकारी कोकणातील जनतेला नाडतात. आमचे हे आजचे आंदोलन शांततामय आहे. पण मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण गावच याठिकाणी उपोषणास बसेल, असा इशाराही यावेळी सुधन कवठणकर यांनी दिला.