अवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:43 PM2021-03-06T17:43:24+5:302021-03-06T17:44:59+5:30
Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.
सिंधुदुर्ग : जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. याचा परिमाण शेतकरी व बागायतदार यांना बसत आहे. हिवाळ्यातही पाऊस तसेच गारा पडून शेती व फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी बाधित होत आहेत. जनावरांसोबतच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाकडून मिळत असलेली मदतही तुटपुंज्या स्वरूपाची आहे.
जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये ऐन थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस व गारा पडल्या होत्या. जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ७७ गुंठे, कणकवली तालुक्यात २ शेतकऱ्यांचे २ गुंठे, असे एकूण ६ हजारांचे नुकसान झाले होते. बागायत पिकांमध्ये केळीचे पाच गुंठ्यावरील नुकसान झाले होते.
फळपिकांमध्ये आंबा, काजू या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यात सावंतवाडी ८ शेतकऱ्यांचे २१ गुंठ्याचे ४ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात ५६ हेक्टर क्षेत्रातील १०३ शेतकऱ्यांचे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ४४ हेक्टर क्षेत्राचे ७६ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे; तर देवगड, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात फळपिकांचे नुकसान झाले नाही.
नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
पाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तात्काळ कृषी सहायक यांच्या माध्यमातून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या जिरायती, बागायती व फळपिकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. आता नुकसानभरपाईकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.