आगामी सणांमुळे येतील सुगीचे दिवस, व्यापारी, छोट्या उद्योजकांना आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:47 PM2020-10-23T17:47:19+5:302020-10-23T17:49:46+5:30
coronavirus, kankavli, market, sindhudurgnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारच्या खरेदीला ब्रेक लागला होता. आता अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत आली असून, कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व खरेदी- विक्रीला गती मिळाली आहे. आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायातही चांगली उलाढाल होईल आणि सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यापारी तसेच लहान-मोठे उद्योजक व्यक्त करीत आहेत.
सुधीर राणे
कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारच्या खरेदीला ब्रेक लागला होता. आता अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत आली असून, कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व खरेदी- विक्रीला गती मिळाली आहे. आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायातही चांगली उलाढाल होईल आणि सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यापारी तसेच लहान-मोठे उद्योजक व्यक्त करीत आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र सरकारने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले होते. परिणामी उद्योग, व्यवसायासह खरेदीही ठप्प झाली. सध्या सुरू असलेल्या या वर्षात प्रत्येकाने केवळ आपला व कुटुंबीयांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर अनावश्यक फिरू नये असे आवाहन केल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू वगळता कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हौस, मौजमजा यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी पूर्णतः थांबविली होती. लॉकडाऊनमुळे मध्यमवर्गीय व सामान्य घटकांवर आर्थिक संकट कोसळले होते. अनेकांना रोजगार मिळू शकला नाही. काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अत्यंत कठीण दिवस अनेकांना जीवनात अनुभवायला मिळाले.
अनेकांना फक्त जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून त्यातूनच प्रपंच चालवावा लागला. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुन्हा सामान्यवर्गाला रोजगार मिळू लागला आहे. मध्यमवर्गीयांची उलाढालही सुरू झाली आहे. परंतु कपड्यांसह इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीला म्हणावी तशी गती अजूनही मिळालेली नाही.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, उपचारासाठी करावी लागणारी कसरत अशा भीतीमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने त्याबद्दलची भीती कमी झाली. त्यामुळे हळूहळू इतर आवश्यक वस्तूंची खरेदी-विक्री, व्यवहार सुरू होत आहेत. दसरा, दिवाळीसारख्या मोठ्या सणाला दरवर्षी मोठी उलाढाल होते. यावर्षी कोरोनामुळे जवळजवळ सहा महिने आर्थिक उलाढालीला लागलेला ब्रेक आता निघत असून, सर्व प्रकारच्या खरेदी - विक्रीला उत्साही वातावरण निर्माण होत आहे.
यानिमित्ताने कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, वाहन, गृह अशा प्रलंबित असलेल्या खरेदी - विक्रीचे व्यवहार व व्यवसायातील उलाढाल होण्याची आशा अनेकांना निर्माण झाली आहे. तशी स्थिती निर्माण व्हावी यासाठी चातकासारखी वाट अनेकजण बघत आहेत.
वाट पाहत आहोत
कोरोनामुळे आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्थिक घडीच पूर्णतः विस्कटली असून ती पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी बाजारपेठेत ग्राहक वाढणे गरजेचे आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी ग्राहक पुन्हा बाजारपेठेकडे वळतील अशी शक्यता वाटते. त्यामुळे आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत.
- संदीप माणगावकर, व्यापारी