कणकवलीवासीयांच्या सेवेत लवकरच अद्ययावत अग्निशामक बंब, नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
By सुधीर राणे | Published: May 3, 2023 02:19 PM2023-05-03T14:19:02+5:302023-05-03T14:19:19+5:30
कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे ...
कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात आगी सारख्या आपत्तीचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत होईल अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.
यावेळी नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक बंब नादुरुस्त झाल्याने निर्लेखित केला आहे. त्यानंतर नगरपंचायतीने राज्य शासनाकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे नवीन अद्ययावत अशा अग्निशामक बंबासाठी ८९ लाख ९२ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात अग्निशामक बंब आपल्याला उपलब्ध होणार आहे.
१९ टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला आणि व १ हजार फोम व ६ हजार लिटर पाणी साठा करू शकणारा हा बंब आहे. इंजिन पॉवर १८० एचपी व शिडीची लांबी १०.५ मीटर आहे. बंबाच्या केबिन मध्ये चालक आणि ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे. या बंबाद्वारे २००० लिटर प्रती मिनीट पाणी फवारणी करू शकतो. बंबात प्रथोमोपचार पेटीही उपलब्ध असणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहरात २४ तास कार्यान्वित असलेले अग्निशामक केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव तयार केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना मोबदल्याचे वाटप करणार आहेत. त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे. या केंद्राच्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या राहतील. याठिकाणी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होईल. हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भूसंपादन झाल्यावर शासनाकडून एक कोटींचा निधी तत्काळ नगरपंचायतीला मिळेल असे बंडू हर्णे यांनी सांगितले.