मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 02:34 PM2023-10-27T14:34:13+5:302023-10-27T14:35:45+5:30

युवा मतदारांची नोंदणी निराशाजनक

Updation of voter lists is in progress, Information given by District Collector of Sindhudur | मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग : लोकशाही सक्षमीकरणासाठी पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण यासाठी  भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. या कालावधीत आक्षेप किंवा हरकती घेता येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केलेली आहेत. दिव्यांगासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने जिल्हयात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. 

०५ जानेवारी, २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ६,७२, ७७६ इतकी होती. निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज रोजी एकूण मतदार संख्या ६,६९,५९८ इतकी असून त्यामध्ये पुरुष मतदार ३,३३,९८७ व स्त्री मतदार ३,३५,६११ व स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण १००५ इतका आहे. जिल्हयाच्या लोकसंख्येत १८ - १९ वयोगटाची टक्केवारी ३.४४ इतकी आहे. पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १.०५ एवढी आहे. ही आकडेवारी निराशाजनक आहे. 

Web Title: Updation of voter lists is in progress, Information given by District Collector of Sindhudur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.