कुडाळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे उपोषण, आश्वासनाअंती उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:10 PM2019-06-08T20:10:48+5:302019-06-08T20:12:35+5:30
कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये मंजूर झालेली जागा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी व या जागेवरील स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी छेडलेले उपोषण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंती गुरूवारी रात्री तब्बल ११ तासांनी मागे घेण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १५ जूनला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी दिला आहे.
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये मंजूर झालेली जागा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी व या जागेवरील स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी छेडलेले उपोषण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंती गुरूवारी रात्री तब्बल ११ तासांनी मागे घेण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १५ जूनला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी दिला आहे.
कुडाळ शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी कुडाळ एमआयडीसी येथे जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, रत्नागिरी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्थानिक लोकांच्या विरोधाचे कारण देत या प्रकल्पाच्या जागेसाठी स्थगिती आदेशाचे लेखी पत्र नगरपंचायतीला पाठविले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
एमआयडीसी प्रशासनाच्या या स्थगिती निर्णयाविरुद्ध नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, सभापती सरोज जाधव, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, नगरसेवक एजाज नाईक, अनंत धडाम, सुनील बांदेकर, राकेश कांदे व काही नागरिकांनी कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर गुरूवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
उपोषण सुरू केल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी दिवसभरात तीन ते चार वेळा चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. मात्र, जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच्या जागेसाठी देण्यात आलेला स्थगिती आदेश रद्द केला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईत नको, तर कुडाळ येथेच बैठक आयोजित करावी, अशी भूमिका नगराध्यक्ष तेली यांनी घेतली. त्यामुळे हे उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. मात्र, अधिकाºयांकडून योग्य निर्णय देण्यास उशीर होत होता.
अखेर गुरूवारी रात्री ११ तासांनी कुडाळ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी कुडाळ येथे १४ जून रोजी बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या उपोषणाला कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी तसेच नाभिक संघटना, कुडाळ सुधार समिती, मनसे, भैरववाडी मित्रमंडळ, हिंदू कॉलनी मित्रमंडळ, कुडाळ व्यापारी वर्ग यांनी पाठिंबा दिला.
सरोज जाधव यांची तब्येत खालावली
या दरम्यान गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उपोषणकर्त्या बांधकाम सभापती सरोज जाधव यांची तब्येत खालावली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर बोलावण्यात आले. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपचार करून घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर या आंदोलनाने अधिक तीव्र रूप धारण केले.
08062019-ङंल्ल‘-03
कुडाळ नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उपोषणादरम्यान सरोज जाधव यांची तब्येत खालावली. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाºयांकरवी उपचार करण्यात आले.