जलसंधारणासाठी चिरेखाणींचा उपयोग
By admin | Published: November 11, 2016 10:33 PM2016-11-11T22:33:10+5:302016-11-11T22:33:10+5:30
सदाशिव ओगले यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा नियोजन समिती सभेत लावून धरली मागणी
देवगड : जिल्हा नियोजन समितीमध्ये गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देवगड तालुक्यातील जांभ्या दगडांच्या चिरेखाणींचा उपयोग जलसंधारणासाठी करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव ओगले यांनी दिली आहे.
१४ आॅक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या विकास समितीच्या सभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सदस्य सदाशिव ओगले यांच्यासमवेत कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन या सर्वांची एकत्रित बैठक ५ नोव्हेंबर रोजी घेतली होती. या बैठकीमध्ये देवगड तालुक्यातील प्रायोगिक स्वरुपात १० ते १२ ठिकाणी जांभ्या दगडांच्या चिरेखाणींमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे ठरले.
यामध्ये दोन प्रकारे हा प्रकल्प राबविता येणार असल्याचे ओगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)