ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

By admin | Published: June 30, 2015 09:52 PM2015-06-30T21:52:20+5:302015-06-30T21:52:20+5:30

अमोल मडामे : गोपुरीत व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन शिबिर

Use energy for good work | ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

Next

कणकवली : देशात तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. या युवा वर्गाची ऊर्जा परिवर्तनाच्या कामासाठी वापरल्यास देश बलशाली होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी जाणकारांनी युवा वर्गासमोर सातत्याने सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. युवा वर्गाकडून होणाऱ्या चुकांसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्यातील ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरूया, असे प्रतिपादन नशाबंदी मंडळ, मुंबईचे संघटक अमोल मडामे यांनी गोपुरी आश्रमात केले. राष्ट्रसेवा दल कणकवली शाखेच्या युवा वर्गासाठी एकदिवसीय व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन कार्यशाळेत ते बोलत होते. अमोल मडामे म्हणाले की, जगात १६ टक्के लोक अतिमद्यपान करतात. त्यात भारतातील मद्यपींचे प्रमाण ११ टक्के आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ कोटी लोक जास्त दारू पितात. याचा परिणाम ७५ कोटी लोकांवर होतो. व्यसन हा जगातील आणि आपल्या देशातील मोठा अतिरेकी आहे. व्यसन माणसे आणि कुटुंबे उद्ध्वस्त करते. आईवडील जर व्यसनी असतील, तर त्यांच्यामुळे त्यांची मुले व्यसनी होण्याची शक्यता ४०० टक्के असते. वरचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती व्यसनांकडे जास्त वळतात. त्याप्रमाणे ग्रामीण आणि झोपडपट्टीतील नागरिक संगतीने व्यसनांकडे कधी वळतात त्यांना कळत नाही. यातून मालाड-मालवणीसारख्या घटना घडतात. व्यसन सोडवायचे असल्यास मनाचा निर्धार असणे गरजेचे असते. हा निर्धार व्यसनमुक्ती कार्यशाळा, समुपदेशन आदी मार्गातून निर्माण करता येतो. व्यसने सातत्याने प्रबोधन करूनच सोडवता येणे शक्य आहे. शासन व्यसने सोडविण्यासाठी निर्णायक क्षमतेपर्यंत येऊ शकत नाही. व्यसन म्हणजे आजारच आहे. कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुराद अली शेख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सुदीप कांबळे, दर्पण सांस्कृतिक मंचचे संस्थापक उत्तम पवार, राष्ट्रसेवा दल कणकवली शाखाध्यक्ष सृष्टी तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

घेतली व्यसनमुक्तीची शपथ
नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या सरचिटणीस वर्षा विलास म्हणाल्या की, युवा वर्गाने पुढील पिढी जबाबदार आणि व्यसनमुक्त बनविण्यासाठी आधी स्वत:साठी आणि आपल्या समाजाला व्यसनांपासून दूर नेण्यासाठी सतर्क रहायला हवे. यावेळी शाहीर रामकृष्ण डिगसकर यांनी गीत व भारुडांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम युवकांसमोर मांडले.
या कार्यशाळेनंतर सायंकाळी शिवाजी चौक ते बुद्धविहार अशी प्रबोधन प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीच्या समारोपप्रसंगी बुद्धविहारात युवा वर्गाला नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.

Web Title: Use energy for good work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.