इंटरनेट, सोशल मीडिया जपून वापरा

By Admin | Published: December 24, 2015 10:21 PM2015-12-24T22:21:58+5:302015-12-25T00:03:56+5:30

हेमंतकुमार शहा : आनंदीबाई महाविद्यालयात ‘सायबर क्राईम’बाबत मार्गदर्शन

Use the Internet, Social Media | इंटरनेट, सोशल मीडिया जपून वापरा

इंटरनेट, सोशल मीडिया जपून वापरा

googlenewsNext

वैभववाडी : इंटरनेट, मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सायबर क्राईमची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर डोकेदुखी ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जेवढा चांगल्यासाठी होतो, त्याहून भयंकर दुष्परिणाम गैरवापरामुळे भोगावे लागतात. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी युवा पिढीने इंटरनेट व सोशल मीडियाचा जपून वापर करावा, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी येथील आनंदीबाई महाविद्यालयात केले. पोलीस खात्यामार्फत येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अविनाश पालवे, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक आर. डी. गुरव, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आदी उपस्थित होते. शहा म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्याला व पोलीस समाज घडवत असतो. त्यामुळे विद्यार्थिदशेत एकदा चुकले तर पुढे सगळे चुकत जाते. सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल केली तर जीवन चांगले घडते. इंटरनेट, मोबाईल काळाची गरज आहे; परंतु त्याचे दुष्परिणामही जाणून घेण्याची गरज आहे. सोशल नेटवर्किंगचा योग्य उपयोग केला नाही, तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आपण टाकलेल्या पोस्टमुळे एखाद्याची बदनामी होऊ शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी त्याच्या गैरवापराचे दुष्परिणाम प्रत्येकाने समजून घ्यावेत. कोणतेही तंत्रज्ञान चांगल्या लोकांच्या हाती लागले तर त्याचा वापर चांगल्यासाठीच होतो. परंतु ते चुकीच्या लोकांच्या हातात पडले तर विघातक कामासाठी त्याचा वापर केला जातो. ते म्हणाले की, समाजातील नाराज लोक सायबर क्राईमकडे वळतात. त्यातही १४ ते ३0 वयोगटाचा समावेश अधिक आहे; परंतु कायद्यात कोणालाही माफी नाही. याचे भान ठेवले पाहिजे. त्यामुळे इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. कोणाचाही डेटा मिळवून तपासण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींची संगत करुन आयुष्य उद्ध्वस्त करुन घेऊ नका. विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ असले पाहिजेत. ‘धूम’ स्टाईलने गाडी चालवून क्षणिक आनंद मिळविण्यापेक्षा चांगल्या मार्गाने नाव कमवा. समाजाला आदर्श तरुणांची गरज आहे. (प्रतिनिधी)


वेळच आयुष्य पालटते!
हेमंतकुमार शहा यांनी वेळेला किती किंमत आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून देताना आपल्याच आयुष्यातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, विश्वास नांगरे-पाटील आणि मी एकाच ठिकाणी शिकत होतो. ते एकेका मिनिटाचा पुरेपूर सदुपयोग करीत असत.
मी व काही मित्र थोडाफार ‘टाईमपास’ करून अभ्यास करत होतो. प्रत्येक मिनिटाला महत्त्व देणारे नांगरे-पाटील आयपीएस बनले. मी अजून पोलीस निरीक्षकच आहे. यावरून वेळच आयुष्य पालटते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेची किंमत ओळखायला शिका, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Use the Internet, Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.