अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:02 PM2017-10-31T15:02:40+5:302017-10-31T15:09:55+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी येथे आयोजित खास कार्यशाळेत ते बोलत होते.
आंबोली : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी सोमवारी येथे आयोजित केलेल्या खास कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिरत्या पथकाचे प्रमुख उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे, सुभाष पुराणिक आदी उपस्थित होते.
प्रकाश बागेवाडी म्हणाले, हत्तींबाबतच्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सर्वांनी जागरुक होणे गरजेचे आहे. हत्ती पकडणे हेच आपल्या हातात राहिले आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हत्तींबाबत काम करावे, असे आवाहन बागेवाडी यांनी केले. तसेच हत्तींना पकडून येथेच ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे असे सांगतानाच हत्तींचे लोकेशन वारंवार तपासत रहावे, असेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच हत्तींना पकडणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत हत्तींसाठी लवकरच कॅम्पची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर व सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमागचा उद्देश स्पष्ट करताना वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, जनता व कर्मचारी यांच्यात होणारे संघर्ष याबाबत कार्यशाळेत विचारमंथन झाले. तसेच नव्याने कशा पध्दतीने हत्ती हटाव मोहीम राबवावी यावर चर्चा झाली.
आजरा, आंबोली भागात फिरणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या दरम्यान वनरक्षक तसेच वनपालांना विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी यांच्यामध्ये उद्भवणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा कार्यशाळेचा समारोप झाला. भविष्यात हत्तींपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.